जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका गावात काही अतिरेकी स्थानिक लोकांच्या घरात दडून बसले होते. त्यांची शोधमोहीम भारतीय सैन्याने सुरू केली. अशोक साके यांची अकरा जणांची तुकडी सर्वात पुढे होती. त्यातही अशोक शीर्षस्थानी होते. एका घरात अतिरेक्यांचा शोध घेताना छतावर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. अतिरेक्यांच्या फायरमधील तीन गोळ्या एकाच वेळी अशोक साके यांच्या डोक्यातून आरपार झाल्या. अशोक जागेवरच कोसळले. आपल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाल्याने इतर भारतीय सैनिक शत्रूवर तुटून पडले. भारतीय सैनिकांनी केलेल्या प्रत्युत्तराने अतिरेक्यांची पळता भूई थोडी अशी अवस्था झाली. त्यांनी छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय बहादुरांनी अतिरेक्यांचा पाठलाग करून एकेकाचा खात्मा करत आपल्या सहका-याच्या बलिदानाचा बदला घेतला.सुंबेवाडी. अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. गाव आष्टी तालुक्यातील असले तरी दैनंदिन व्यवहार नगरशीच जुळलेले. नगरपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर सुंबेवाडी गाव वसलेले आहे़ तेथील हरिश्चंद्र बाबूराव साके हे माजी सैनिक़ त्यांनी १७ वर्षे सैन्यात सेवा केली. १९६५ व १९७१ साली झालेल्या पाकिस्तानविरूद्धच्या दोन्ही लढाईत ते सहभागी होते. सैन्यात असल्याने गावात मान-सन्मान होता. देशातील बहुतांश ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट सेवा केली. देशसेवा त्यांच्या रक्तात भिनली होती़ त्यामुळे आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करायचे, हा त्यांचा निश्चय होता. १९७१ चे भारत-पाक युद्ध नुकतेच संपले होते. हरिश्चंद्र साके सीमेवर तैनात असतानाच निरोप आला त्यांना पुत्ररत्न झाल्याचा. १९७२ साली त्यांनी एका गोड, साहसी व पराक्रमी मुलाला जन्म दिला. नाव ठेवले अशोक. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात, त्याप्रमाणे अशोक लहानपणापासून चपळ व कष्टाळू होते. ठरवलेली गोष्ट करणारच अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे हे पोरगं बापाच्या पायावर पाय ठेवून सैन्यात जाणार असे कुटुंबीयांनाही वाटायचे. हरिश्चंद्र यांच्या पत्नी ताराबाई या मुलगा अशोक यांच्यावर देशसेवेचे संस्कार करत होत्या. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना दुसरे पुत्ररत्न झाले. त्याचे नाव ठेवले चंद्रशेखर. अशोक व चंद्रशेखर लहानाचे मोठे होऊ लागले. गावात केवळ चौथीपर्यंत शाळा. त्यामुळे प्राथमिक शिक्षण सुंबेवाडीत घेऊन दोघे बंधू पुढील शिक्षणासाठी गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील पिंपळा येथे जाऊ लागले. अशोक पुढच्या वर्षात तर चंद्रशेखर एका वर्गाने मागे, असा हा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. पाचवी ते सातवीपर्यंत शाळेची व्यवस्था पिंपळ्यात होती. दोघेही गावातून पिंपळ्यापर्यंत रोज पायी शाळेत येत असत.दरम्यान, सन १९८० मध्ये हरिश्चंद्र साके निवृत्त झाले. आठवीसाठी अशोक व चंद्रशेखर दोघांनीही रूईछत्तीशी येथे प्रवेश घेतला. दोघेही रोज दहा किलोमीटर अंतर पायी तुडवत जात असत. हे त्यांचे कष्ट, जिद्द आपसूकच त्यांच्या कामी आले. एवढ्या लांब पायी रपेटमुळे त्यांची आपसूकच सैन्य भरतीची तयारी होत होती. दहावी सुटल्यानंतर अशोक व चंद्रशेखर दोघेही सैन्य भरतीसाठी जात. वडिलांना सैन्यदलाचा अनुभव असल्याने त्यांचे योग्य मार्गदर्शन मुलांना होतेच. अशोक अकरावीत असताना त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी भरती केल्या. परंतु यश येत नव्हते. १९९२ मध्ये अखेर त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. योगायोग म्हणजे अशोक लातूरला व चंद्रशेखर हे नगरला एमआयआरसीमध्ये एकाच दिवशी भरती झाले. कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. हरिश्चंद्र यांच्यासाठी तो दिवस कौतुकाचा होता. कारण त्यांच्याप्रमाणेच त्यांची दोन्ही मुले देशसेवेत त्यांचा वारसा चालवणार होते.अशोक यांनी बंगलोर येथे सैन्यातील प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली. इकडे अशोक यांचे बंधू चंद्रशेखरही नगर येथील एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण दलात कार्यरत होते. दोघेही सुटीनिमित्त अधूनमधून गावी यायचे.१९९६ मध्ये अशोक साके यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात होती. पाकिस्तानच्या सीमेला लागून असल्याने या जिल्ह्यात नेहमीच अतिरेकी घुसखोरीचे प्रकार होत. या जिल्ह्यातील गावांत अतिरेकी घुसखोरी करून गावातील लोकांना वेठीस धरत सैन्यावर हल्ले करायचे. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सैन्याकडून येथे सर्च आॅपरेशन चालायचे. हेच ते ‘आॅपरेशन रक्षक’. वातावरण तणावपूर्ण होते. परंतु याच दरम्यान अशोक यांचे लग्न ठरले. त्यामुळे महिनाभराची सुटी घेऊन ते गावी आले. गावात लग्नाची सर्व तयारी झालेली होती. बाराबाभळी (ता. नगर) येथील अलका यांच्याशी त्यांचा विवाह झाला. महिनाभराची सुटी संपल्यानंतर अशोक पुन्हा पोस्टिंगच्या ठिकाणी रूजू झाले.लग्नाला केवळ १५ दिवस झाले होते. त्याच दरम्यान पुलवामा जिल्ह्यात काही पाकिस्तानी आतंकवादी घुसल्याची बातमी सैन्यदलाकडे आली. लागलीच सर्च मोहीम सुरू झाली. लष्कराच्या विविध तुकड्या करून गावन्गावे पिंजून काढण्याचे काम सुरू झाले. अशोक यांच्या अकरा जणांच्या तुकडीकडे एक गाव अतिरेक्यांची शोधमोहीम करण्यासाठी देण्यात आले होते. त्यानुसार १० सप्टेंबर १९९६ रोजी भल्या सकाळीच अशोक यांच्यासह अकरा जणांची तुकडी थेट सरपंचाच्या घरी पोहोचली. परंतु घराला कुलूप होते. त्यामुळे सैनिकांचा संशय आणखी बळावला. सैनिकांनी घराचे कुलूप तोडून शोधमोहीम सुरू केली. अकरा जणांची ही सैन्य तुकडी हत्यारांनी सुसज्ज होती. अशोक तुकडीच्या सर्वात पुढे होते. घराचा खालचा मजला तपासून झाल्यानंतर घराच्या वरच्या मजल्याकडे ही तुकडी निघाली. जिन्याची एक एक पायरी अगदी हळूच पार करत ते वर जात होते. अशोक सर्वात पुढे असल्याने ते मागील सैन्याला दिशा देत होते. जिन्याच्या मध्यावर गेल्यानंतर वरून अचानक अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सुमारे चार ते पाच अतिरेकी घरावर लपून बसलेले होते. त्यांच्याकडेही अत्याधुनिक बंदुका होत्या. परंतु अतिरेक्यांच्या फायरमधील तीन गोळ्या एकाच वेळी अशोक साके यांच्या डोक्यातून आरपार झाल्या. अशोक जागेवरच कोसळले. त्यांच्या मागे असलेल्या एका जवानाच्या मांडीला गोळी लागली. अचानक झालेल्या या हल्ल्याने भारतीय सैन्य तुकडी काही वेळ मागे सरकली़ परंतु आपल्या तुकडीतील शूरवीर अशोक साके या सहका-याचा मृत्यू झाल्याने त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ‘हर हर महादेव’ अशी एकच गर्जना करत सर्वच्या सर्व जवानांनी वरच्या दिशेने रँडम फायर सुरू केले. भारतीय सैनिकांनी केलेल्या या प्रत्युत्तराने अतिरेक्यांची पळता भूई थोडी झाली. त्यांनी छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय बहादुरांनी अतिरेक्यांचा पाठलाग करून एकेकाचा खात्मा करत आपल्या सहकाºयाच्या बलिदानाचा बदला घेतला.अशोक साके यांच्या मृत्यूची तार सुंबेवाडीला धाडण्यात आली. तब्बल पाच दिवसांनी ही तार गावात पोहोचली. कारण तेव्हा सुंबेवाडीला पिंपळा हे पोस्ट होते. येथील पोस्टमनने तार देण्यास उशीर केला. त्यामुळे नंतर त्यावर कारवाई होऊन त्याला निलंबित करण्यात आले.दरम्यान, अशोक यांच्या मृत्यूने सुंबेवाडीत एकच शोककळा पसरली. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी अशोकचे लग्न झालेले होते. आपल्या आयुष्याचा जोडीदार केवळ १५ दिवसांत सोडून गेल्याने अशोक यांची पत्नी अलका स्तब्ध झाली होती. चोवीस वर्षे ज्या पोटच्या गोळ्याला जीव लावला त्याच्या मृत्यूच्या बातमीने आई ताराबाई यांचे तर भानच हरपले. भाऊ चंद्रशेखर, वडील हरिश्चंद्र यांच्यावरही दु:खाचा डोंगर कोसळला.त्यावेळी दळणवळणाच्या सोई-सुविधा कमी होत्या़ त्यामुळे जम्मूवरून अशोक यांचे पार्थिव सुंबेवाडीला आणणे शक्य नव्हते. परिणामी जम्मू येथेच लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाला त्यांचे अंतिम दर्शनही झाले नाही. सहाव्या दिवशी त्यांचा अस्थीकलश घेऊन चार जवान सुंबेवाडीत दाखल झाले. ‘माझा अशोक कुठंय?’, असे म्हणत या जवानांना पाहून आईने एकच टाहो फोडला़ आईच्या या टाहोने सैनिकही गहिवरून गेले. त्यांनी हृदयावर दगड ठेवून घडला प्रकार अशोक यांचे वडील व भाऊ चंद्रशेखर यांना सांगितला. अशोक खूप शूर होता. युद्धजन्य स्थितीत किंवा कोणत्याही आॅपरेशनमध्ये तो नेहमी पुढे असायचा. त्याला मरणाची कधीही भीती वाटली नाही. त्यामुळे देशासाठी त्याने दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास देत या सैनिकांनी साके कुटुंबीयांचा निरोप घेतला.सध्या हरिश्चंद्र व ताराबाई हे दाम्पत्य सुंबेवाडीत राहत आहे. अशोकची पत्नी माहेरी असते. दरम्यान, अशोक यांचे बंधू चंद्रशेखर हे सैन्यातून निवृत्त झाले असून, गेल्या दहा वर्षांपासून ते सुंबेवाडीचे सरपंच आहेत. देशसेवा केल्यानंतर आता ते गावाची सेवा करत आहेत. संपूर्ण साके कुटुंबीयांनी देशसेवा करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
- शब्दांकन : चंद्रकांत शेळके