लोकमत मुलाखत / सुधीर लंके । अहमदनगर : कर्जत जामखेड मतदारसंघात जो पैशांचा वापर सध्या सुरु आहे तेवढा वापर यापूर्वी जिल्ह्यात कधी झाला नाही. विखे पाटील परिवाराने जिल्ह्यासाठी काम केले म्हणून मी दक्षिणेतून खासदारकी लढवली. रोहित पवार व त्यांच्या परिवाराने कर्जत-जामखेडसाठी आजवर काय योगदान दिले त्याचे एक तरी उदाहरण द्यावे. उलट जगदंबा हा शेतक-यांचा सहकारी साखर कारखाना यांनी खासगीकरण करुन विकत घेतला. खासगी कारखाने घेण्यासाठी यांच्याकडे एवढा पैसा आला कोठून? अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुजय विखे हे महायुतीच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. जिल्ह्यात त्यांनी १२-० असे चित्र निर्माण करण्याचा नारा दिला आहे. त्यांची भाषणेही गाजत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद. जिल्ह्यात महायुतीसाठी निवडणुकीचा माहोल कसा आहे ? - खूप चांगली परिस्थिती आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांनी चांगली तयारी केली आहे. त्यांच्या पाठिमागे जनतेचे चांगले समर्थन उभे आहे. जिल्ह्यात तुम्ही १२-० म्हणजे युती सर्व जागा जिंकेल असा नारा दिला आहे. काँग्रेसने त्यावर टीका केली आहे.- काँग्रेसकडे टीका करणारी व्यक्ती राहिलेली नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष तालुक्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या टिकेवर काय बोलायचे. आम्ही १२-० चा संकल्प केला आहे. जनता आमच्या पाठिशी असल्याने त्यावर आमचा विश्वास आहे. बाळासाहेब थोरात यांचा फोटो आपण घरात लावू असे तुम्ही म्हणालात?- बाळासाहेब थोरात व शरद पवार या दोन नेत्यांमुळे मला काँग्रेसचे लोकसभेचे तिकीट मिळाले नाही. त्यामुळे भाजपात जाऊन मी खासदार झालो. एकप्रकारे खासदार होण्याची संधी या दोघांनीच मला दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे आभार तर मानलेच पाहिजेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावला पाहिजे असे म्हणालो. शरद पवारांचे नातू रोहित पवार कर्जत-जामखेडमधून लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध तुम्ही आक्रमक दिसता. हा विखे-पवार असा संघर्ष आहे का? - कर्जत-जामखेडच नाही सर्व मतदारसंघात मी सभा घेत आहे. माझे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय आहेत. कर्जत-जामखेडमध्ये काही लोकांकडून वेगळे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. जो पैशाचा वापर तेथे सुरु आहे तो नगर जिल्ह्याने यापूर्वी कधीही पाहिलेला नाही. रस्त्यांवर मुरुम टाकणे, जेसीबी लावणे, पाण्याचे खासगी टँकर लावणे असे प्रकार केले जातात. जे लोक हे करतात त्यांनी त्यासाठी मतदारसंघात एवढा पैसा आणला कोठून? येथे राजकीय पक्षांतरे घडवली जात आहेत. पैसे देऊन हे प्रवेश घडविणे सुरु आहे. हा पैसा आला कोठून? त्या उत्पन्नाचे स्त्रोत त्यांनी दाखवावेत. भविष्यासाठी हे अत्यंत घातक आहे. हे लोक प्रलोभने दाखवून निघून जातील. पुढे जनतेला अडचणीच्या काळात वाली कोण राहील? आपणाला हे राजकारण मान्य नाही. रोहित पवार हे पार्सल बारामतीवरुन नगर जिल्ह्यात आले, असा तुमचा आरोप आहे. मात्र, सुजय विखे, चंद्रकांत पाटील हेही दुस-या मतदारसंघातून लढले असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.- सुजय विखे व रोहित पवार यांच्यात फरक आहे. आमच्या कुटुंबाने गत पन्नास वर्षे घाम गाळून जिल्ह्यात शेतक-यांना न्याय देण्याचे काम केले. कर्जतचा जगदंबा कारखाना आमचे आजोबा खासदार बाळासाहेब विखे यांनी सहकारी तत्वावर चालविण्यास घेतला होता. जनतेत जाऊन आम्ही निवडणुका लढविल्या. त्यांनी कारखान्यांचे खासगीकरण केले नाही. या भागात आम्ही जिल्हा परिषदेला आमचे प्रतिनिधी उभे करुन निवडून आणले आहेत. आमच्या कुटुंबाने काम केले म्हणून मी या भागातून निवडणूक लढवली. तसे पवार कुटुंबाचे या भागासाठी व जिल्ह्यासाठी काय योगदान आहे? कर्जत-जामखेडसाठी यांनी एक रुपयाचे तरी योगदान दिले का हे सांगावे. त्यांनी जगदंबा कारखाना खासगी तत्वावर विकत घेतला हे योगदान आहे का? कारखाना विकत घेतल्यावर पूर्वीच्या सहकारी कारखान्यात शेतक-यांच्या ज्या ठेवी होत्या त्याचे काय झाले? कामगारांच्या ग्रॅच्युईटीच्या ज्या रकमा होत्या त्याचे काय झाले ? ३७ कोटीला कारखाना घेतला पण कारखान्याची जमीन अडीचशे कोटीची आहे, त्याचा हिशेब लागत नाही. ज्याच्या नावावर जमीन घेतली तो एका स्कॅममध्ये फरार होता. त्याच्याबरोबर भाडेतत्वाचा करार करुन हा कारखाना सुरु आहे. भाडेतत्वाच्या करारावर दीडशे कोटीचा कारखाना हा कुठला करार आहे? असा करारच आपण आजवर पाहिलेला नाही. हे दीडशे कोटी आले कोठून? या कारखान्याच्या खासगीकरणाला पवार जबाबदार आहेत? -निश्चित. दुसरे कोण जबाबदार आहे. यांचे एवढे खासगी कारखाने होतातच कसे? सहकारी बंद पडलेले कारखाने कमी किमतीत यांनी घेतले. आम्ही तीन कारखाने चालवतो. पण, बंद पडलेले सहकारी कारखाने आम्ही सहकारी तत्वावरच चालवतो. जेथे खासगीकरण होते तेथे शेतकºयांचे हित पाहिले जात नाही, असे आपले म्हणणे आहे. शिखर बँक घोटाळ्यात रोहित पवारांचे नाव आहे असाही आरोप युतीकडून होत आहे.- या घोटाळ्याची मोठी व्याप्ती आहे. त्यात ६० नावे आहेत. कारखानदारी अडचणीत असल्याने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न शिखर बँकेने केला असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. अडचणीतील कारखान्यांना मदत करायला हवी. पण, बंद पडलेल्या कारखान्यांचे मूल्यांकन व नंतर त्यांचे खासगीकरण करुन ते कवडीमोल भावात विकत घेण्याचे काम पवार परिवाराने केले. हे संपूर्ण राज्याला माहित आहे. निवडणुकीत पाणी खूप गाजते आहे. मुळाचे पाणी बीडला पळविण्याची चर्चा सुरु आहे.- मुळाची कुठली चारी किंवा पाईपलाईन बीडपर्यंत जातेय? ही सर्व अफवा आहे. जोपर्यंत विखे पाटील आहेत तोवर शेतकयांच्या हक्काचे पाणी कोठेही जाऊ देणार नाही. बीडला पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रेड सिस्टिम आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आराखडा तयार केला आहे. मुळातून पाणी जाण्याचा प्रश्नच नाही.कर्जत, श्रीगोंद्याच्या निवडणुकीत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न चर्चेत आहे. त्यावर काय मत.- कुकडीचे आवर्तन सुटल्यानंतर शेतक-यांना पाणी मिळत नाही. मात्र अंबालिका कारखान्याचे तळे, ओढेनाले भरले जातात. सिंचनाला पाणी नाही मग कारखान्याला कसे मिळते? अजित पवार हे मंत्री असताना त्यांचे लेखी पत्र आहे की जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी मिळू शकत नाही. मग रोहित पवार आता पाणी कोठून देणार आहेत? केवळ निवडणुकीसाठी ते कुकडीच्या पाण्याचे आमिष लोकांना दाखवत आहेत. कुकडीच्या पहिल्या ५६ किलोमीटरचे काम होत नाही तोवर शेवटपर्यंत पाणी येणार नाही. हे काम भाजप सरकारच करु शकते. राष्ट्रवादीची सत्ताच येणार नाही तर कोठून हे काम करणार आहेत? राष्ट्रवादीची सत्ता असताना यांनी कुकडीवर किती खर्च केला हे त्यांनी एकदातरी सांगावे. उगाच जनतेला खोटे सांगण्यात काय अर्थ आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये होतात. आता भाजपत आल्यावर काँग्रेसवर सर्वाधिक टीका तुम्हीच करत आहात. काही घालमेल होते मनात?- घालमेल होण्याचे कारण नाही. आपली भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे तिकीट मागितले होते. सुजय विखे कोण ? असा प्रश्न त्यावेळी राष्ट्रवादी करत होती. त्यांना मी निवडून येण्याच्या पात्रतेचा वाटलो नाही. आता सुजय विखे काय आहे हे त्यांना दिसत आहे. मी भाजपत असल्याने युतीचा प्रचार करतो आहे. महायुतीला तुमच्याकडून मोठ्या आशा दिसतात. विखे फॅक्टर निवडणुकीत काय जादू दाखविणार?- जादू ही विखे परिवाराची नाही. जादू ही नरेंद्र मोदी व त्यांच्या योजनांची आहे. फडणवीस सरकारने जे काम केले त्याची आहे. आमच्यावर प्रेम करणारे सर्व लोक महायुतीच्या उमेदवारांसाठी झटत आहेत. श्रीगोंदा तालुक्यात मी राजेंद्र नागवडे यांना भाजपत आणू शकलो. पारनेरमध्ये सुजित झावरे यांना आमदार विजय औटी यांच्या पाठिशी उभे केले. शेवगावमध्ये जुळवाजुळव करुन मोनिका राजळेंमागे यंत्रणा उभी केली आहे. कर्जत-जामखेडमध्ये बंडखोरी थांबवली. राहुरीत शिवाजी कर्डिले यांच्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उभा आहे. पक्षासाठी हे काम करता आले याचा आनंद आहे.काँग्रेस म्हणते आम्हीही १२-० करु- बरोबर आहे. ते शून्य आहेत आम्ही बारा आहोत.
आम्ही ‘जगदंबा’ टिकविला; त्यांनी विकत घेतला-सुजय विखे यांचे पवारांवर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 1:00 PM