PM Narendra Modi : रमजान महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संगमनेरातील मुस्लीम बांधवांनी पत्र पाठवले आहे. "आम्हाला आपले अभिनंदन करावं वाटतं की, तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपण कुठलाही कटुतेचा भाव न ठेवता पवित्र अशा रमजान महिन्यात 'सौगात-ए-ईद' या उपक्रमासाठी प्रथमच पुढाकार घेतला. आपण दिलेली भेट आम्ही स्वीकारणारच आहोत. परंतु त्या मिठाईचा खरा आनंद आम्हाला तेव्हाच होईल, ज्या दिवशी दिवसरात्र हिंदू-मुस्लिम असा द्वेष पसरवणाऱ्या लोकांविरुद्ध आपण कडक शासन कराल, हीच कळकळीची विनंती," असं या पत्रात म्हटलं आहे.
उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. "आपला भारत देश विविधतेने नटला असून सर्वच जातिधर्मातील लोक, निरनिराळ्या भाषांचे लोक खूप प्रेमाने गेल्या हजारो वर्षापासून एकत्र राहत आहेत. आपला देश एकतेचा संदेश देणारा देश आहे. राम-रहिम संस्कृती जपून गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे सण उत्सव, नवरात्र, गणेशोत्सव, रमजान या देशातील सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करत आहे. आपण आमच्याबद्दल विचार केला म्हणून आम्ही आनंदित आहोत. परंतु पवित्र अशा रमजान महिन्यात आम्ही ही भावना आपल्यापर्यंत पोहचवू इच्छितो की, देशात हिंदू-मुस्लिम वातावरण निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या विषयीदेखील आपण व आपले सरकार पावले उचलतील त्या दिवशी आमची खरी ईद साजरी होईल. ही आम्ही समस्त मुस्लीम समाजाची भावना आपल्याप्रति व्यक्त करत आहोत," असंही पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, या पत्रावर शौकत पठाण, जमीर शेख, इस्माईल शेख, शोहेब खान, आसिफ शेख, साजीद शेख, शाहरुख शेख, मिर्झा सालार यांची नावे आणि सह्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेले पत्र नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांनी स्वीकारले.