अहमदनगर : सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून न्याय मिळेल, दिलासा मिळेल असा विश्वास निर्माण करण्याबरोबरच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
पाटील हे सोलापूर येथून नगरला बदलून आले आहेत. त्यांनी गुरुवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या बावीस वर्षांच्या सेवेत आपण सोलापूर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, भिवंडी अशा शहरांमध्ये काम केले आहे. नगरबाबत आपण ऐकून होतो परंतु या जिल्ह्यात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यात सर्वाधिक मोठा जिल्हा असल्याने येथे काम करण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कामगिरी व जबाबदाºया पार पाडणे, तसेच पोलीस कल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवणे अशा काही गोष्टींना आपण प्राथमिकता देणार आहे.
नगर जिल्ह्यात यापूर्वीच्या अधिकाºयांनी केलेले काम पुढे नेणे, अधिकाधिक गुन्ह्यांची उकल कशी करता येईल यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्यात पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, रिक्त जागा भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करूच परंतु आहे त्या पोलिसांची कार्यक्षमता वाढवून तसेच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक प्रभावी काम कसे करता येईल याचा प्रयत्न करणार असल्याचे पाटील म्हणाले.