अहमदनगर : हवामान खात्याचा अचूक अंदाज व त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाने केलेले कौतुकास्पद कार्य यामुळे निसर्ग चक्रवादळपासून महाराष्ट्राची हानी टळली, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आढावा बैठकीसाठी आले असता मंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निसर्ग चक्रीवादळाचा आधीच अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट होत्या. एनडीआरएफ टिम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्कता दाखवल्याने जीवितहानी टळली. वादळ आल्यानंतरही जी काही थोडी पडझड झाली किंवा महामार्गावर झाडे पडली ते यंत्रणेने रात्रीतून दूर केले. इतर जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचे काम महसूल यंत्रणेकडे सुरू आहे.
दरम्यान, कोरोनामुळे ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत सरकारचा महसूल बंद होता. परंतु सर्व शासकीय कार्यालये आणि महसूल देणा-या यंत्रणा सुरू झाल्याने आता स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समितीही आढावा घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन उत्तम कार्य करीत आहे. लोकांनीही आता स्वयंशिस्त पाळून कोरोनाबरोबर जगण्याचे शिकण्याची गरज आहे, असेही थोरात यांनी सांगितले.