लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ऊस तोडणी कामगाराच्या साडेचार वर्षीय मुलीचा मृतदेह सोमवारी सकाळी ९ वाजता एका विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. या मुलीचा घातपात केल्याचा संशय पोलिसांना असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ब्राह्मणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगारांची हंगामी वसाहत आहे. तेथून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके यांनी दिली.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून ऊस तोडणी कामगाराची मुलगी दिपाली शरद मोरे ही बेपत्ता होती. शनिवारी तिच्या कुटुंबीयांनी दिवसभर शोध घेतला. मात्र, ती सापडली नव्हती. अखेर शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला. रविवारी सकाळपासून श्रीरामपूर पोलीस विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह नगरमधील शीघ्र कृती दलाच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. अखेर एका विहिरीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाची नगर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. पुढील तपास सुरू आहे.
...............
मुलीच्या बापाला घेतले ताब्यात
मुलगी बेपत्ता झाली त्या रात्री बाप दारू पिऊन मुलीला घेऊन गेला असल्याचे मुलीचे आईने सांगितले. त्यामुळे संशयित म्हणून बापाला ताब्यात घेतले आहे. उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली. शरद गजानन मोरे (रा.लोहगाव, ता.नेवासा) असे संशयिताचे नाव आहे.
..................
बापानेच दिली फिर्याद
मोरे यास दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री बायको बरोबर त्याचे भांडण झाले होते. दरम्यान मुलीला घेऊन तो बाहेर गेला होता. रात्री परत आला असता बायकोने मुलीबाबत विचारणा केली. त्याने शोध घेतला. मात्र, मुलगी सापडली नाही. शनिवारी शरद मोरे याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.