शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शेळीवर झडप घातली. शेळीला उचलून नेण्याच्या प्रयत्नात त्याला विहिरीचा अंदाज आला नाही. त्यामुळे शेळीसह तो विहिरीत पडला. काहीतरी मोठा आवाज झाल्याने रमेश भगत यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना विहिरीत बिबट्या व शिकार केलेली शेळी आढळून आली.
यानंतर भगत यांनी आरडाओरड करून लोकांना याबाबत कळविले. लोकांनी विहिरीत बाज सोडून शेळीला बाहेर काढले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. कोपरगावचे वनपाल भाऊसाहेब गाढे, विकास पवार, गोरख सुरासे, सूर्यकांत लांडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले. सकाळी बिबट्याला बाहेर काढताना गर्दी जमा होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी रात्रीच मोहीम राबविली. रात्री एक वाजता त्यांनी विहिरीत बाज सोडली. त्या बाजेवर बिबट्या बसला व सुखरूप बाहेर आला. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून परिसरात ठेवण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. हा अडीच वर्षे वयाचा मादी बिबट्या आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.
---------