कर्जत : कुकडीला पाणी नाही, विहिरी आटल्या, बोअरची पाणी पातळी खालावली, सुकलेल्या फळबागा, जळत चाललेली पिके, कोरडे पडलेले तलाव, बंधारे अशी अवस्था कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. पाणीटंचाई जाणवू लागली आहे. दोन वर्षांपासून कुकडीच्या आवर्तनाचे गणित बिघडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील तीस हजार हेक्टर क्षेत्र कुकडीमुळे सिंचनाखाली येते. या पाण्याच्या भरवशावर शेतकरी पिकांचे नियोजन करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. गेल्या वर्षीही कुकडीचे पाणी मिळावे यासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कर्जत तहसील कार्यालयापुढे उपोषण केले होते. यावर्षी तर कुकडीच्या पाण्याने कळसच केला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात कुकडीअंतर्गत असलेल्या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता. असे असतानाही कर्जतकरांना पूर्वीप्रमाणे ओव्हर फ्लोचे पाणी मिळाले नाही. शिवाय आवर्तन मंजुरीप्रमाणे सुटले नाही. मग कर्जतसाठीचे मंजूर पाणी गेले कोठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या कुकडी लाभक्षेत्रातील विहिरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. तलाव व बंधारे कोरडे पडले आहेत. फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. पिके जळत आहेत. उन्हाळी कांदा अगोदरच काढून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हाती आलेली पिके डोळ्यांदेखत सुकत आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत, विरोधकही गप्प बसले आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे कुकडी पट्ट्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिंपळवाडी, दूरगाव, चिलवडी, कोरेगाव, हंडाळवाडी, आंबिजळगाव, खातगाव, राशीन ग्रामपंचायतीने थेरवडी, दूरगाव तलावात कुकडीचे पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.
---
०८कुकडी कॅनाल, ०८ दूरगाव तलाव, ०८ पिके
कर्जत तालुक्यातील कोरडा पडलेला दूरगाव तलाव, कुकडीचा कॅनाॅल, राशीन परिसरातील पाण्याअभावी जळून चाललेला ऊस.