अहमदनगर: महापालिकेने साडेआठ कोटींच्या कामांसाठी मागविलेल्या निविदांवरून ठेकेदार व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर आला आहे. निविदेत वाढीव क्षमतेच्या डांबर ड्रम मिक्स प्लँटची अट टाकण्यात आली आहे. हा प्लँट बोटावर मोजण्या इतक्याच ठेकेदारांकडे आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामांसाठी अशी अट नव्हती. ती याचवेळी का आणि कुणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आली? याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात आहे. शासनाच्या नगरोत्थान महाभियान व नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत महापालिकेला ८ कोटी ४६ लाखांचा निधी मंजूर आहे. या निधीतून २९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. ही कामे करण्यासाठी महापालिकेने आॅनलाईन निविदा प्रसिध्द केल्या आहेत. निविदा प्रसिध्द करताना त्यासोबत महापालिकेने एक शुध्दीपत्रक प्रसिध्द केले. त्यामध्ये डांबरीकरणाच्या कामासाठी डांबरचा प्लँट ६० ड्रम मिक्स क्षमतेचा असावा,अशी अट आहे. यापूर्वीच्या कामांसाठी ४५ ड्रम मिक्स क्षमतेच्या प्लँटची अट होती. हा प्लँट असलेल्या ठेकेदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे छोटे ठेकेदार त्यांच्याशी करार करून निविदा भरत होते. हा प्लँट असलेल्या ठेकेदारांशीच करार करून त्याची प्रत निविदेसोबत भरावी लागणार आहे. मात्र हे ठेकेदार किती जणांशी करार करणार, यावरच निविदेतील स्पर्धेचे गणित अवलंबून असणार आहे. ---अट वगळण्याची ठेकेदारांची मागणीडांबरीकरणाच्या कामासाठीची वाढीव क्षमतेच्या डांबर मिक्स प्लँटची अट वगळण्याची मागणी अभिजित काळे, ए.पी. सोनीमंडलेचा, दीपमाकर,चंद्रशेखर गटणे, निकेतन शिवाजी लोटके या चार ठेकेदारांनी निवेदनाव्दारे केली आहे.--- महापौरांचे प्रशासनाकडे बोट निविदेतील अटीबाबत महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, निविदेत काय अटी असाव्यात हा निर्णय पूर्णत: प्रशासनाचा आहे. प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करणे योग्य नाही. याबाबत प्रशासन निर्णय घेईल.
अहमदनगर महापालिकेत साडेआठ कोटींची कामे बड्या ठेकेदारांना देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 5:06 PM