सुधीर लंके
नगर शहरात कोरोनाची साथ वाढत आहे. मात्र, या परिस्थितीतही महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार हे काही निर्णयांबाबत गंभीर दिसत नाहीत. आपल्या सोयीने ते आपत्तीचा कायदा वापरताना दिसत आहेत. आयुक्तांना महापौरही जाब विचारत आहेत का? हा प्रश्नच आहे.
महपालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर नाहीत, अशा बातम्या माध्यमांमधून गेले तीन दिवस सुरु आहेत. याबाबत आयुक्तांनी स्वत: काहीही खुलासा केलेला नाही. महापालिकेत चार प्रमुख आरोग्य अधिकारी आहेत. यातील एक आरोग्य अधिकारी हे घनकचºयाचे व्यवस्थापन पाहण्यात गुंतले आहेत. वैद्यकीय अधिकाºयासाठी घनकचरा व्यवस्थापनापेक्षा रुग्ण अधिक महत्त्वाचा आहे. मात्र महापालिकेने घनकचºयाचे काम अन्य अधिकाºयांकडे न सोपविता तेथे वैद्यकीय अधिकारी गुंतवून ठेवला आहे. महापालिकेच्या स्टाफिंग पॅटर्नमध्येच ही तरतूद आहे. जी विसंगत वाटते. अन्य महापालिकांत घनकचरा व्यवस्थापनाचे काम उपायुक्त पाहतात.
महापालिकेचे दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे हे ऐन आपत्तीच्या काळात दोन आठवडे कामावरच नव्हते. अल्पवयीन मुलाच्या छळाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल असल्याने ते गायब होते. ते आता पुन्हा कामावर हजर झाले आहेत. कोरोनाची आपत्ती सुरु असताना बोरगे अनुपस्थित कसे राहू शकतात? त्यांनी रजा घेतली होती का? आयुक्तांनी ही रजा मंजूर कशी केली? ते विनापरवानगी गैरहजर असतील तर त्यांचेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही? असे अनेक प्रश्न आहेत. याचे उत्तर अद्याप आयुक्तांनी व महापौरांनीही शहराला दिलेले नाही.
जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या विनापरवानगी पुण्याला गेल्या म्हणून महसूल प्रशासनाने त्यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक अधिकारीही या कारणावरुन निलंबित झाला. मग, महापालिकेच्या अधिकाºयांना हे धोरण का लागू नाही? जबाबदारी सोडून गायब असणारे डॉ. बोरगे व महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शंकर मिसाळ हे नगर शहरात होते की बाहेरगावी गेले होते? हा सगळा प्रकार घडल्यानंतरही बोरगे हे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसोबत बिनधास्त बैठका करत आहेत.
बोरगे व मिसाळ यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात वस्तुस्थिती काय आहे हे न्यायालयात समोर येईल. मात्र, त्यांनी आपत्तीच्या काळात शहर वाºयावर सोडून अनुपस्थित राहणे ही गंभीर बाब आहे. त्यांची ही अनुपस्थिती खपवून घेत आयुक्तांनी त्यांना पाठिशी घालणे हे त्याहूनही गंभीर आहे. त्यामुळे आयुक्त हे स्वत: नियमांबाबत गंभीर आहेत का? हा प्रश्न निर्माण होतो.
प्रशासनावर आपला जरातरी अंकुश हवा हे महापालिकेचे महापौर, पदाधिकारी व नगरसेवकांना वाटत असेल तर त्यांनीही याबाबत आयुक्तांना जाब विचारायला हवा. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मध्यंतरी शहर स्वच्छता मोहिमेत रस दाखविला. एकदा त्यांनी प्रशासनाचीही साफसफाई करणे आवश्यक आहे. महापालिकेने कोविडच्या तपासणीसाठी खासगी लॅबला काम देण्याची जी घाई केली, तो निर्णयही योग्य आहे का? हे तपासले जायला हवे.