अहमदनगर : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक जीवनातील हा टप्पा महत्त्वाचा असून ही परीक्षा हवीच, असे विद्यार्थी, पालकांचे म्हणणे आहे. मात्र कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तर अन्य पर्याय काय याबाबत गोंधळ सुरू आहे. पूर्ण वेळ किंवा पूर्ण गुणांची परीक्षा झाली नाही तरी वेळ कमी करून, अभ्यासक्रम कमी करून का होईना परंतु परीक्षा व्हावी असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून मुलांना पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीची परीक्षा पुढील शैक्षणिक करिअरसाठी महत्त्वाची असल्याने ऑनलाईन का होईना परंतु परीक्षा झाली पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. बारावीचा अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेत कपात करून परीक्षा घ्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. सर्व विषयांची एकच प्रश्नपत्रिका आणि तीही बहुपर्यायी स्वरूपात तयार करून केवळ एकच दिवसात ऑनलाईन परीक्षा घेऊन मूल्यांकन होऊ शकते, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकंदरीत बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांमध्ये गोंधळ आहे. अंतिमत: शासन काय निर्णय घेते, यावरच आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरणार आहे.
------------
जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - ६४१२४
शाळा - ४५०
-----------
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात बारावीचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे परीक्षा होणे गरजेचे आहे. ऑफलाईन शक्य नसेल तर ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. यात शाखानिहाय सर्व विषयांची एकच एमसीक्यू पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करून एकाच दिवशी पेपर घ्यावा. त्यावर गुणपत्रिका तयार करता येईल.
- डॉ. प्रा. दत्तात्रय घुंघार्डे, न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेर
-------------
कोणत्याही परिस्थितीत बारावीची परीक्षा व्हावी. ऑफलाईन परीक्षा शक्य नसेल तर ऑनलाईन का होईना परीक्षा घ्यावी. त्यात अभ्यासक्रम कमी करून किंवा वेळेतही कपात करून परीक्षा शक्य आहे.
- प्राचार्य सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक संघटना
-------------
वर्षभरापासून आम्ही बारावीचा अभ्यास करत आहोत. आता परीक्षा रद्द झाली तर खूप मोठे नुकसान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा महत्वाची आहेच परंतु करिअरच्या दृष्टीने ऑनलाईन का होईना परीक्षा झाली पाहिजे.
- पवन पवार, विद्यार्थी
--------------
सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव परीक्षा घेता आली नाही तरी कोरोना स्थिती आटोक्यात आल्यानंतर परीक्षा घ्यावी. पुढील करिअरच्या दृष्टीने ही परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षा रद्द हा पर्याय होऊ शकत नाही.
- अक्षय साबळे, विद्यार्थी