Congress Balasaheb Thorat ( Marathi News ) : "मी १९८५ साली आमदार झाल्यानंतर कधीही दंगल झाली नाही. हिंदू-मुस्लिमांत आपण सतत बंधुभाव टिकवला. पण राजकीय स्वार्थासाठी विरोधकांनी थोरात मुस्लिम धार्जिणे आहेत असा गावोगाव खोटा प्रचार केला. सोशल मीडियावर अपप्रचार केला. निवडणुकीत जातीय व धार्मिक विष पेरले गेले," असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीकेला आहे. आपण मानवता व बंधुभाव सोडणार नाही. या शक्तीविरोधात प्राणपणाने लढू, असंही थोरात म्हणाले.
विरोधकांवर आरोप करताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, "मतदारसंघात सोशल मीडियावर खोट्या पोस्ट तयार करण्यात आल्या. त्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पोहोचल्या. नवीन तंत्रज्ञानानुसार कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे ठरते.. आपल्याच कॉलेजच्या, आपल्याच घरातील मुलांमध्ये अशा पोस्ट गेल्या. ज्यातून त्यांची माथी भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की ज्यातून त्यांना चीड निर्माण होईल. इतका भडकपणा करण्यात आला. त्यातून बऱ्याच मंडळींचे मन बदलले. माझी राजकारणाची पद्धत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची आहे. मी कुणाचाही द्वेष करत नाही. सर्वांचा आदर करतो. संगमनेर तालुक्यात प्रत्येक समाजाला मानाचे स्थान आहे. प्रत्येक घटकाला येथे संधी दिली. त्यामुळेच बाजारपेठ फुलली. धार्मिक विष पेरणाऱ्यांना हा विकास दिसला नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी कितीही विष पेरले तरी आपण मानवता धर्म सोडणार नाही. लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल," अशा शब्दांत थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"नवीन आमदार त्यांचे हत्यार"
"प्रवरा कारखान्याचे गट ऑफिस आता शेडगाव आणि रहिमपूर येथे काढण्यात आले आहे. तेथे नोंदी द्या, म्हणायला लागले. आपल्याकडे गट ऑफिस काढायचे एवढे धाडस कसे व्हायला लागले. याचा अर्थ असा, हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थांवरसुद्धा सुरू झाला आहे. एन्ट्री तिकडून केलेली आहे. त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढला आहे. आता कारखान्यावर चढाई करून कारखाना संपवून टाकू. त्यांचे हत्यार नवीन झालेला आमदार आहे. संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्यासाठी हे हत्यार वापरले जाणार आहे," अशी टीका थोरात यांनी महसूमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.
पराभव नाही घात
"बाळासाहेब थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही. मात्र, जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी सुसंस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला," अशी टीका माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.