अहमदनगर : ‘भाजपने श्रीगोंदा शहरातील उमेदवाऱ्या कोणत्या निकषावर दिल्या. श्रीगोंदा शहरात बाजीराव मस्तानी चित्रपट चालला आहे का?’ या राष्टÑवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. या विधानाला श्रीगोंदा नगरपालिकेतील महिला उमेदवारांनी आक्षेप घेतला असून हा महिलांचा अवमान असल्याची तक्रार राष्टÑवादीकडे केली आहे. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनीही जगताप यांची ‘री’ ओढली आहे.श्रीगोंद्याचे नगराध्यक्षपद महिला वर्गाला राखीव आहे. पालिकेत पन्नास टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. असे असताना जगताप यांनी ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ निवडणुकीत कशासाठी आणला? याबाबत श्रीगोंदा शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.जगताप यांनी या विधानाचा इन्कार केलेला नसून उलट मी कोणाचेही नाव घेऊन बोललेलो नाही. जर कोणाला जिव्हारी लागले असेल तर माझा नाईलाज आहे, असे समर्थन केले आहे. मात्र, जगताप यांना या विधानातून नेमके काय ध्वनित करावयाचे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.या आरोपांना जातीय संदर्भही प्राप्त झाल्याने विविध समाज घटकांतूनही नाराजी व्यक्त होत आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट व श्रीगोंद्याचे राजकारण याचा काय संदर्भ ? हा प्रश्न राष्टÑवादीचे नेते आमदार जगताप यांना विचारणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.‘बाजीराव मस्तानी’ म्हणजे काय? जगतापच सांगतीलआमदार जगताप यांनी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. ‘बाजीराव मस्तानी’चा संदर्भ त्यांनी दिला असला तरी ज्यांना तो लागला तीच मंडळी याचे भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी जगताप यांच्याकडे खुलासा मागितला तर ते त्याचे उत्तर देतील किंवा विरोधकांनी ‘बाजीराव मस्तानी’ कोण आहे हे विचारले तर त्याचेही ते उत्तर देतील, असे सांगत फाळके यांनीही जगताप यांच्या विधानाचे एकप्रकारे समर्थन केले आहे.
‘बाजीराव मस्तानी’ व श्रीगोंद्याच्या राजकारणाचा संदर्भ काय? : आमदार राहुल जगताप यांच्या वक्तव्याने वादंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 2:20 PM