अहमदनगर : विखे परिवाराला काँग्रेसने काहीही कमी केले नाही. सुजय यांच्या वडिलांना विरोधी पक्षनेतेपद दिले. आईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. असे असतानाही त्यांनी बालहट्ट करुन अडचणीच्या काळात काँग्रेस सोडली. विखेंना काँग्रेसने काय कमी केले? याचे उत्तर त्यांनीच द्यावे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व काँग्रेसचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.थोरात म्हणाले, जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत होती तेव्हा विखे परिवाराने दगाफटका केला. बाळासाहेब विखे यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली होती. मध्यंतरी विखे पिता-पुत्र शिवसेनेतही गेले. शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना पक्षाने मंत्रिपद दिले. आता सुजय हे भाजपात गेले. आपल्या मुलाचा हा बालहट्ट राधाकृष्ण विखे यांनी थांबवायला हवा होता. ते स्वत: राज्यात विरोधीपक्षनेते आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही हे पक्षांतर थांबले नाही. यातून चुकीचा संदेश गेला आहे.श्रेष्ठी निर्णय घेतीलमुलगा भाजपामध्ये गेल्यामुळे पक्ष राधाकृष्ण विखे यांच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काही निर्णय घेणार का? असा प्रश्न केला असता थोरात म्हणाले, याचा निर्णय स्वत: विखेच घेतील. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व श्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. जे घडले ते अत्यंत चुकीचे व गंभीर आहे.
काँग्रेसने विखेंना काय कमी केले होते?- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 3:28 AM