अहमदनगर : प्रत्येकाने योग्य ती खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे प्रत्येकाने पालन केले तर कोरोनाला हरवणे सहज शक्य आहे, अशी प्रतिक्रिया कोरोनामुक्त झालेल्या अहमदनगरमधील पहिल्या रुग्णाने (२९ मार्च) डिस्चार्जनंतर दिली. अहमदनगरमध्ये पंधरा दिवसांपूर्वी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. परंतु हा रुग्ण आता बरा होऊन रुग्णालयाबाहेर पडल्याने नगरकरांना दिलासा मिळाला आहे. आपले अनुभव सांगताना हा रुग्ण म्हणतो की, मी १ मार्च रोजी मी दुबईहून नगरला आलो. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात माझी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल १२ मार्च रोजी आला आणि त्यात पॉझिटिव्ह आढळल्याने मला बूथ हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या काळात येथील सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी तसेच जिल्हा प्रशासनाने आपली योग्य ती काळजी घेतली. त्यामुळेच मी आज बरा होऊन घरी जात आहे. नगरकरांना माझे आवाहन आहे की, सर्वांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. त्यामुळे या रोगाचा वाढणारा संसर्ग थांबेल आणि या लढाईत आपण कोरोनावर मात देऊ शकतो.
नगरचा कोरोना बरा झालेला रुग्ण काय म्हणतो?...वाचा अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 2:47 PM