शिर्डी : जनमताच्या विरोधात जावून बनलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीन चाके आहेत. यातील चाकांची हवा कमी झाल्यानंतर ते भरण्याचे ठिकाण नेमकं मुंबई, बारामतीला की संगमनेरला आहे? हा खरा प्रश्न आहे, अशी टीका खासदार सुजय विखे राज्य सरकारवर केली.
खासदार विखे यांच्या हस्ते कोरोना चाचणी संकलन केंद्राचे शिर्डीत उद्घाटन झाले. यानंतर नगरपंचायतीमध्ये पदाधिकाºयांसमवेत झालेल्या बैठकीनंतर विखे यांंनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही सरकार पाडू इच्छित नाही. सरकार आपोआप पडणार आहे. महाविकास आघाडीच सरकार त्यांनी चांगल चालवावे, अशी आमची इच्छा आहे. मात्र ते चालवत नाहीत. फक्त भाजपवर आरोप केला जातो, अशी टीका खासदार विखे यांनी केली़
शिर्डीचे साईबाबा मंदिर लवकरात लवकर सुरु करावे, यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून आपण देणार असल्याची माहिती भाजपचे खासदार विखे यांनी दिली.
राज्यातील तीर्थक्षत्र असलेल्या मंदिरामध्ये विश्वस्त मंडळ आहेत. आॅनलाईन पासेसच्या माध्यमातून दर्शनाचे नियोजन करु शकतात. अशा मंदिरांना राज्य सरकारने परवानगी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.