अहमदनगर : संसदेचे भगवेकरण झाले की काय अशी शंका आता यायला लागली आहे. मंदिर, मस्जिद याच्यावरच चर्चा होत आहे. पण नव्या पिढीमध्ये आधुनिकता, वैज्ञानिकता रुजविण्यासंदर्भात मंथन होत नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या शताब्दी सांगता महोत्सवात पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप, आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर उपस्थित होते.पवार म्हणाले, महाराष्ट्रात जनतेच्यामदतीने संस्थांचे रोपटे उभे राहिले. या संस्थांना शेतक-यांच्या संबधी आस्था होती. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक पिढ्या या संस्थांतून सज्ञान झाल्या. जिल्हा मराठा संस्थेनेही हे कार्य अविरतपणे सुरु ठेवले असून हे काम कौतुकास्पद आहे. या संस्थेला मोठा वैचारिक वारसा आहे.