जामखेड : गावाच्या विकासासाठी ग्रामस्थ गटतट विसरून एकत्र येत असतील, ग्रामपंचायत बिनविरोध करत असतील तर त्यात चुकीचे काय आहे? गावात गटतट असावेत, असा त्यांचा हेतू असावा, असे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्यांना बक्षीस जाहीर करण्यामागे प्रामाणिक हेतू होता, असेही पवार यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी बिनविरोध ग्रामपंचायत करणाऱ्या गावांना ३० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर नगर येथे प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी निधी देण्यावरच आक्षेप घेतला होता. त्यांच्या टीकेला पवार यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले की, कोरोना काळात लोकांचा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर गटतट असतात. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांसाठी खर्च वाढतो व तणाव वाढतो. दोन गट असल्याने विकासकामात अडथळा येतो. विकास खुंटतो. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. निवडणूक बिनविरोध होत असेल तर त्यांना भरीव निधी दिला तर त्यात गैर काय? कदाचित त्यांचा हेतू वेगळा असावा. त्यांना वाटत असेल, वेगळ्या पद्धतीने पैसे वाटत असतील; मात्र तसे काही नाही. सर्वजण एकत्र येऊन गटतट विसरून निवडणूक बिनविरोध होत असेल त्यात गैर काय? असे पवार यांनी सांगितले.
----
काय म्हणाले होते शिंदे..
ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन आहे. असे प्रलोभन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, अशी टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली होती.