अहमदनगर : अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्याची केंद्र व राज्य सरकारने घोषणा केली. दुसरीकडे धान्य शिल्लक राहत असल्याने केशरी कार्डधारकांनाही धान्य सवलतीच्या दरात देण्याची घोषणा झाली. मात्र, स्वस्त धान्य दुकानांमध्ये तांदूळ पोहोचलाच नसल्याने गव्हाचे वाटपही लांबले आहे. त्यामुळे लाभार्थी मात्र वंचित राहिले आहेत.
कोरोना लॉकडाऊनमध्ये गरिबांना मोफत धान्य देण्याची घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली. दोन्ही योजनांतून लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी धान्य घेण्याचे टाळले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची धान्याची गोडावूनमधून उचलही केली नव्हती. हे लक्षात आल्यानंतर सरकारने केशरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याची घोषणा केली. आता दिवाळीपर्यंत धान्य मोफत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र, सध्या स्वस्त धान्य दुकानांवर फक्त गहूच उपलब्ध आहे. तांदूळ आल्यानंतरच दोन्हीचे वाटप करण्यात येईल, असे स्वस्त धान्य दुकानदार सांगत आहेत. त्यामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
----------
गोंदिया येथून तांदूळ येणार
नगर जिल्ह्याला मिळणारा तांदळाचा कोटा हा गोंदिया जिल्ह्यातून येणार आहे. ज्या जिल्ह्यात ज्या धान्याची जास्त खरेदी झाली, त्या जिल्ह्यातून धान्याचे वितरण होते. गोंदिया येथून धान्याची उचल झाली असली तरी वाहतूक करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी सर्व दुकानांवर तांदळाचे वाटप करण्यास आणखी आठवडा जाणार आहे.
---------
ही आहे तांत्रिक अडचण
लाभार्थ्यांना एकाच वेळी गहू आणि तांदूळ दिले जातात. त्यानंतर लाभार्थ्याचा अंगठा पॉज मशीनवर घेतला जातो. त्यामुळे दोन्ही धान्य मिळाल्याचे निश्चित होते. सध्या दुकानांवर फक्त गहू उपलब्ध आहे. गव्हाचे वाटप करायचे असेल तर लाभार्थ्यांचा अंगठा घ्यावा लागेल. यावेळी मात्र गहू आणि तांदूळ घेतल्याची नोंद समजली जाते. त्यामुळे तांदूळ येईपर्यंत गव्हाचे वाटप करणे शक्य होणार नाही, असे दुकानदार सांगत आहेत.
-------------