अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’मुळे मोठी शहरे बंद असल्याने जिल्ह्यातील कारखान्यांचे उत्पादन निम्म्याने घटले असून, कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. मोठ्या कारखान्यांनी कामगारांना सुट्या दिल्या आहेत. त्यामुळे हे कामगारही घरीच बसून आहेत.
जिल्ह्यात बोटावर मोजण्याइतकचे मोठे कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांना सुटे भाग पुरविणारे अनेक लहान कारखाने आहेत. मोठ्या कारखान्यांचे उत्पादन घटल्याने या कारखान्यांवर अवलंबून असणारे कारखान्यांचे उत्पादन घटले आहे. लहान कारखाने मुंबई व दिल्ली येथून कच्चा माल आणतात; परंतु ही शहरे सध्या बंद असल्याने कच्चा माल मिळत नाही. कच्च्या मालाचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मोठ्या कंपन्यांकडून मालाची मागणी होते; परंतु त्या प्रमाणात पुरवठा करणे लहान कारखान्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांनी मागणीनुसारच उत्पादन करण्यावर भर दिला असून, कामगारांच्या हाताला काम राहिले नाही. गेल्या वर्षभरापासून उत्पादनात घट झालेली असल्याने कामगारांना पगार देणे, आजारासाठी उचल देणे, यामुळे उद्योजकांना अशक्य झाले असून, दररोज कोणत्या ना कोणत्या कारखान्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने अनेक कामगार कामावर येत नाहीत. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे काही कारखान्यांना कामगार मिळेनासे झाले आहेत. कामगारांअभावी उत्पादन कमी करण्यात आल्याचे काही उद्योजकांचे म्हणणे आहे.
.....
जिल्ह्यातील एकूण कारखाने
९५०
...
एकूण कामगार
५०,०००
....
८० टक्के कारखाने सुरू
जिल्ह्यातील नागापूर, सुपा, नेवासा, श्रीरामपूर, केडगाव औद्योगिक वसाहतीतील ८० टक्के कारखाने सुरू आहेत. शासनाचे नियम पाळून कारखाने सुरू आहेत. कामगारांची गेटवर दररोज आरोग्य तपासणी केली जात असून, आजारी कामगारांना सुटी देण्यात येत आहे. इतर कामगारांना संसर्ग होऊ नये यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून काळजी घेतली जात आहे.
....
- जिल्ह्यातील बहुतांश कारखाने सुरू आहेत; परंतु कच्चा माल मिळत नसल्याने उत्पादन २५ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे उद्योजक अडचणीत आले असून, कोरोनामुळे कामगारही मिळत नाहीत. कामगारांना कोरोनाची लागण होत असल्याने नियमांचे पालन करून कारखाने सुरू आहेत.
- राजेंद्र कटारिया, अध्यक्ष, आमी संघटना
.....
- मोठ्या कारखान्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या लहान कारखान्यांची संख्या नगरमध्ये जास्त आहे. मोठे कारखाने सुरू आहेत. त्यांच्याकडून मागणी होत आहे; परंतु कच्चा माल मिळत नाही. मुंबई पूर्णपणे बंद असल्यामुळे कच्चा मिळत नाही आणि मिळालाच तर दर कमालीचे वाढलेले आहेत. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून, उद्योजकांचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे.
- संजय बंधिष्टी, सचिव, आमी संघटना
....
कारखान्यांत तयार झालेल्या मालाला मागणी नाही. त्यामुळे कारखान्यांचे उत्पादन घटले असून, कामगारांना सुट्या दिल्या जात आहेत. सुटीच्या काळातील अर्धा पगार दिला जात आहे; परंतु कारखान्यांकडून तोही दिला जात नसल्याने कामगारांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- कामगार
.....
कारखान्यांनी उत्पादन बंद केल्याने हाताला काम राहिले नाही. गेल्या महिनाभरापासून घरी बसून आहोत. त्यामुळे घर कसे चालवायचे असा प्रश्न आहे.
- कामगार
....
कॉपर, स्टीलचे दर वाढले
मोठ्या कारखान्यांना माल पुरविण्यासाठी कच्चा माल लागतो. नगरमध्ये मुंबई शहरातून कच्चा माल येतो; परंतु सध्या मुंबई बंद आहे. त्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. स्टील प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये दराने खरेदी करावे लागत आहे. इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असून, उत्पादन करणे खर्चिक झाले आहे. त्यामुळे उद्योजकांचे अर्थचक्र काेलमडले असून, ‘ब्रेक द चेन’मुळे उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे.
......