अहमदनगर: विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारपासून लागू झाली आहे़ जिल्हा प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत़ तसेच राजकीय पक्षांनी जाहिरात फलक, भिंतीपत्रके आणि चिन्हे लावली असतील तर ती काढून टाकण्याची व्यवस्था करावी, अन्यथा आचारसंहितेचा भंग केल्याबाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला़केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ ची घोषणा केली आहे़ राज्यात एकाच टप्प्यात येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेतले जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत कवडे बोलत होते़ जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत़ जिल्हा निवडणूक शाखेकडून निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे़ कर्मचाऱ्यांना निवडणुकीबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ प्रत्येक मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे़ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया मतदारसंघातच पूर्ण होईल़ जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी ३ हजार ५९३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे़ मतदान केंद्रांत लोकसभा निवडणुकीप्रमाणे मतदान यंत्र असतील़ मात्र नगर शहर मतदारसंघात ‘व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट ट्रायल’ हे मशीन जोडले जाईल़ त्यामुळे आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची खात्री करता येणार आहे़ ही व्यवस्था केवळ शहर मतदारसंघातील मतदान केंद्रांवरच असणार आहे़ इतर मतदान केंद्रावर ही व्यवस्था असणार नाही, असे कवडे यांनी यावेळी सांगितले़विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३२ लाख ४ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येईल़ मतदान नोंदणीची प्रक्रिया उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसापर्यंत सुरू राहील़ ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव असेल, त्याच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे़ केवळ ओळखपत्र असून, चालणार नाही़ मतदारांना त्यांच्या घरीच मतदानासाठीची चिठ्ठी मिळेल़ तसेच मतदान केंद्राबाहेरदेखील चिठ्ठी देण्याची व्यवस्था केली जाईल़ प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांवर नियुक्तीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक असणार आहे,असे कवडे म्हणाले़ (प्रतिनिधी)
आचारसंहिता लागताच प्रशासन कठोर
By admin | Published: September 12, 2014 10:57 PM