अहमदनगर : संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हावे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे; पण त्यासाठी संजय राऊत हे यूपीएचे प्रवक्ते कधी झाले? असा सवाल माजी मंत्री व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे केला आहे.
प्रा. शिंदे यांनी बुधवारी नगर येथे पत्रकारांशी अनौपचारिकपणे संवाद साधला. ते म्हणाले, राऊत म्हणतात, पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावे. पी. चिदंबरम म्हणतात, पवार असे बोललेच नसतील. शरद पवार म्हणाले, बातम्यातून मला हे समजले. यावरून आता संजय राऊत हे यूपीएचे कधी प्रवक्ते झाले, हे पाहण्याची आवश्यकता आहे. मुळात शिवसेना यूपीएचा घटक नाही.
ईडीच्या चौकशीबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रा. शिंदे म्हणाले, कंगना रनौतसंदर्भात कारवाई केली, त्यावेळी संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नसल्याचे सांगितले होते. आता ईडी लागल्यावर त्याला ते सद्बुद्धीचे राजकारण असल्याचे सांगतात. धुळ्याचे राजेंद्रकुमार गावित हे भाजपचे नेते असून, त्यांनाही ईडीची नोटीस आली आहे. हेही लक्षात घेतले पाहिजे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावात तीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
याबाबत शिंदे म्हणाले, हे बक्षीस म्हणजे त्यांनी लोकांना दिलेले प्रलोभन आहे. असे प्रलोभन आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशा पद्धतीने निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यास दुमत नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार हे आचारसंहितेचे उल्लंघन करीत आहेत. सध्या ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ते पैसे देतात, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, खासदार, आमदार यांच्या निवडणुका अशाच बिनविरोध होतील. पवार यांच्या वक्तव्याची राज्य निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली.