...जेव्हा अचानक राहुल गांधी संगमनेरला मुक्काम करतात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 04:57 AM2019-04-28T04:57:46+5:302019-04-28T04:58:46+5:30
साधेपणाचा अनुभव, तोच कुर्ता धुऊन प्रचारासाठी रवाना
सुधीर लंके
अहमदनगर : ऐनवेळी मुक्काम करण्याची वेळ आल्यावर अंगावरील आहे तेच कपडे रात्रीतून धुऊन पुढील प्रवास करण्याची वेळ सामान्य माणसावर येते. तोच साधेपणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडूनही संगमनेरकरांना अनुभवायला मिळाला. मुक्कामात सोबत काहीच नसल्याने रात्रीचे वापरण्याचे कपडे देखील त्यांनी संगमनेरमधील एका दुकानातून घेतले.
संगमनेर येथे सायंकाळी सात वाजता त्यांची सभा होणार होती. मात्र, ते रात्री आठ वाजता विमानाने नाशिक येथे पोहोचले. तेथून पुढे दीड तासांचा प्रवास करुन कारने ते संगमनेरला आले. उशीर झाल्यामुळे भाषण त्यांना अर्ध्या तासातच संपवावे लागले. सभा संपल्यावर रात्री त्यांनी ‘मै आज यही व्हॉल्ट करुंगा’ अशी इच्छा युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्याकडे प्रदर्शित केली. संगमनेर अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील ‘पर्णकुटी’ विश्रामगृहावर व्यवस्था करण्यात आली.
मुक्कामाच्या तयारीने न आल्यामुळे राहुल यांचेसोबत दैनंदिन वापरण्याच्या कपड्याची बॅग देखील नव्हती. अंगावरील कुर्ता त्यांनी रात्री धुण्यासाठी दिला व सकाळी इस्त्री करुन तो पुन्हा वापरला. रात्रीच्या जेवणात त्यांनी मराठमोळी झुणका भाकरी तर सकाळचा नाश्ता म्हणून थालीपीठ खाल्ले. या मुक्कामात त्यांनी बाळासाहेब व सत्यजित तांबे यांच्या परिवाराशी संवाद साधला.
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर
संगमनेर येथून साडेदहाच्या सुमारास हेलिकॉप्टरने ते नाशिकला रवाना झाले. या वेळी थोरात हे त्यांच्या समवेत होते. या प्रवासात राहुल गांधी यांनी थोरात यांच्या गळ्यात हात घालून छायाचित्र काढले. त्यांनी स्वत:च ते इन्स्टाग्रामवर शेअर केले.
गतवेळच्या मुक्कामानंतर नगरला मिळाला विरोधी पक्षनेता
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राहुल गांधी हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आले होते. त्यावेळी त्यांची लोणी येथे सभा झाली होती. या सभेनंतर ते कारने शिर्डी येथे हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. या प्रवासात राधाकृष्ण विखे यांनी कारचे सारथ्य केले होते. या वेळी त्यांनी संगमनेर येथे मुक्काम केला. गतवेळच्या मुक्कामात राधाकृष्ण विखे व बाळासाहेब विखे हे त्यांच्या सानिध्यात होते. तेथून विखे व त्यांची जवळीक अधिक वाढली. पुढे विखे विरोधी पक्षनेते झाले. या वेळी विखे यांनी कॉंग्रेसची साथ सोडली आहे. थोरात हे आता गांधी परिवाराच्या सानिध्यात आहेत.
‘लोकमत’च्या मुलाखतीचे केले अवलोकन
राहुल गांधी यांची दीर्घ मुलाखत शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाली. या मुलाखतीचेही सकाळी गांधी यांनी अवलोकन केले.