देवळाली प्रवरा प्रतिनिधी : इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांसह माल वाहतूक गाडीतून जात असताना देवळाली प्रवरा गुहा शिव परिसरात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यकर्त्यांनी पकडले. कदम यांनी पोलिसांना बोलावून घेत त्यांना प्रशासनाच्या हवाली केले. एवढेच नाही तर त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करून माणुसकीही दाखवली. कोरोना पार्श्वभुमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. परंतु इचलकरंजी येथून सुमारे 70 जणांनी राजस्थान येथे जाणार्या मालवाहतूक वाहनांमध्ये बसून गावाकडे जाण्यास आगेकूच केली होती. दरम्यान, देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनात अनेक स्वयंसेवक प्रशासनाच्या कामकाजात हातभार लावत आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा शहरात विविध भागात चेक पोस्ट सुरू केली आहे. गणेगाव रोड चेक पोस्ट वर वाहनांची तपासणी सुरू असताना स्वयंसेवकांना खाद्य घेवून जात असलेल्या माल वाहतूक गाडीमध्ये काही लहान मुले दिसली. स्वयंसेवकांनी पाहणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये 60 ते 70 जण खाद्यामध्ये लपून बसलेले होते. त्यांच्यावर ताडपत्रीचे आवरण टाकलेले होते.स्वयंसेवकांनी तात्काळ नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याशी संपर्क साधला. नगराध्यक्ष कदम यांनी सर्वांना एका शाळेत नेत तहसीलदार व पोलिस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. पकडलेल्या परप्रांतीय नागरीकांना जेवणाची व्यवस्था नगराध्यक्ष कदम यांनी केली. राहुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन बागूल, पोलिस हावलदार शिरसाठ, होमगार्ड प्रमुख अनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर गाडीमध्ये सापडलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांना राहुरी फॅक्टरी येथील शासकीय शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे. इचलकरंजी येथील कापड मील कारखान्यातून संबंधित कामगारांनी राहुरी पर्यंत प्रवास केल्याचे पाहून प्रशासनही चक्रावले होते.------मजूर राहुरीतच राहणारराज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. माल वाहतूक करणार्यांनी परप्रांतीय नागरीकांना घेवून प्रवास करीत मोठी चूक केली. दरम्यान, संबंधित परप्रांतीय कामगारांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊन काळापर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून केली जाईल अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.
राजस्थानमध्ये जाणाºया मजुरांना नगराध्यक्षच जेंव्हा पकडतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:20 AM