शेखर पानसरे
संगमनेर : सेवानिवृत्तीनंतर पेन्शन हा आधार असतो. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू केली. त्यानंतर हिमाचल प्रदेश, छत्तीसगडमध्ये ती सुरू झाली. याचा अर्थ जेथे काँग्रेसचे राज्य आहे, तेथे जुनी पेन्शन योजना सुरू झाली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतरही विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. १८) संगमनेर तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद तसेच खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संगमनेर बसस्थानकाच्या बाहेर आमदार थोरात यांनी बेमुदत संपात सहभागी असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे होते. आपली अर्थव्यवस्था मोठी होत असताना सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने मदत करणे आवश्यक आहे. हे विधानसभेत आम्ही मांडलेले आहे. असेही आमदार थोरात म्हणाले.