- मधु ओझा पुणतांबा (जि़ अहमदनगर) : शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणी केली़ मात्र पिकांना खते मिळत नसल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत़ कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्तास रांगा लावूनही युरिया खताच्या एक अथवा दोन गोण्या मिळत आहेत. मात्र, युरियासोबत इतर खते किंवा कीटकनाशके घेण्याची सक्ती केली जात आहे.
युरियाचा तुटवडा भासणार नसल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी ग्रामीण भागात युरिया सहजासहजी मिळत नाही. कृषी सेवा केंद्रात फक्त १२० ते १५० युरियाच्या गोण्या येत आहेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्याने वाटप कसे करावे, याचा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. युरिया खरेदी करणारा शेतकरी इतर माल घेण्याचे नाकारत आहे. त्यामुळे शेतकरी-कृषी सेवा केंद्र चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत़