अहमदनगर : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर हे सध्या राहुरी तालुक्यातील मांजरी येथे ध्यानधारणा आणि शेतात रमले आहेत. सकाळी मुळा नदीकाठी योगासने, ध्यानधारणा व उर्वरित वेळेत बांधावरील शेतक-यांशी संवाद असा त्यांचा गेल्या महिनाभरापासून दिनक्रम सुरू आहे.जानकर हे लॉकडाऊनपूर्वी नगर जिल्ह्यात आले होते. महिनाभर संगमनेर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी राहिले. त्यानंतर २ मे पासून ते राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांच्या मांजरी येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. संचारबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, यासाठी जानकर यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. जुंधारे यांचे निवासस्थान मुळा नदीकाठापासून जवळच आहे. जानकर हे दररोज पहाटे पाच वाजता नदीकाठी योगासन व ध्यानधारणा करण्यासाठी जातात. त्यानंतर दिवसभरात पुस्तक वाचन, शेतात फिरून काम करणारे तरुण व शेतक-यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणे, असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळसवडे हे जानकर यांचे मुळगाव आहे. तेथे त्यांचे दोन भाऊ राहतात. जानकर हे मात्र गेली कित्येक वर्ष आपल्या घरी गेले नाहीत.
एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री व सध्या आमदार असलेले सकाळी गुळाचा चहा, दोन वेळा साधा भाजी-भाकरीचा आहार घेतात. त्यांची ही साधी राहणी कार्यकर्त्यांना प्रेरणा देते, असे रासपचे युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून नगर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. या काळात ग्रामीण जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केला. राहुरी तालुका हा बागायती पट्टा आहे. या परिसरात बºयापैकी शेतकरी कुटुंब सधन असले तरी त्यांच्यात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. शेतक-यांनी मुलांना चांगले शिक्षण द्यावे़ जोडव्यवसाय करावे़ शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे, असे माजीमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.