लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मास्टरमाइंड पत्रकार बाळ ज. बोठे गेल्या बारा दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. पाच पोलीस पथके त्याचा चौफेर शोध घेत आहेत. तो मात्र लपलाय कोठे, याचा पत्ता पोलिसांना लागेना.
जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना जेरबंद केले. या सर्व आरोपींची पोलीस कोठडी संपून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील बोठेच्या सहभागाचे महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत. हे हत्याकांड का केले हे मात्र अद्याप समोर आलेेले नाही. बोठेच्या अटकेनंतरच याचा खुलासा होणार आहे. बोठे मात्र पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत आहे. कुणाची मदत घेतल्याशिवाय एवढे दिवस बाहेर राहणे शक्य नाही. त्यामुळे बोठेला कोण मदत करत आहे. याचाही पोलीस शोध घेत आहेत. बोठेबाबत माहिती असेल तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करावा, असेही आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. सराईत गुन्हेगारांना सहज जेरबंद करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेलाही बोठे सापडेना कसा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
.....................
शिंदे, शेख न्यायालयीन कोठडीत
हत्याकांडातील मारेकरी ज्ञानेश्वर शिंदे व फिरोज शेख यांची पोलीस कोठडी संपल्याने रविवारी त्यांना पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने या दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.