अहमदनगर : कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, पण तुम्ही दाखल केलेल्या रुग्णाला कुठलेही लक्षणे नाहीत, अशा रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ मिळणार नाही़ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने काळजीपोटी रुग्णालयांत दाखल होणाºयांचीच संख्या सर्वाधिक आहे़ परंतु, लक्षणे नसणाºयांना जनआरोग्य योजनेतून वगळण्यात आल्याने अनेकांना पदरमोड करूनच इलाज करून घ्यावा लागत आहे़ त्यामुळे ही योजना पॉझिटिव्ह असणाºया सर्वांसाठी लागू करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
सरकारने शंभर टक्के नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे़ या निर्णयाचा सर्वत्र मोठा गाजावाजा झाला़ कोविड आजाराचाही सदर योजनेत समावेश करण्यात आला आहे़ परंतु, ही योजना कोविडची लक्षणे आहेत, अशा रुग्णांनाच दिला जात आहे़ सदर योजनेत कोविडसाठी स्वतंत्र पॅकेज आहेत़ लक्षणे नसणाºयांसाठी कुठलेही पॅकेज नाही़ त्यामुळे अशा रुग्णांना पदरमोड करून खाजगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागत आहेत़ नगर शहरासह जिल्ह्यात ३८ रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू आहे़ पण या रुग्णालयांनी कोविड रुग्णांसाठी सेवा उपलब्ध केलेली नाही़.
खाजगी सहा कोविड सेंटर आहेत़ रुग्णालयांत दाखल होत असलेल्या सर्वाधिक रुग्णांमध्ये लक्षणेच दिसत नाहीत. मात्र त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे. केवळ लक्षणे नसल्याने त्यांना योजनेतून डावलले जात आहे़ कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वसामान्य नागरिक काळजीपोटी जागा मिळेल तिथे दाखल होतात़ सरकारी सुविधा अपुºया असल्याने अनेकांना नाईलाजाने खाजगी रुग्णालयात जावे लागते. पण लक्षणे नसल्याने सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही़
लक्षणे नसलेल्यांना ‘नो एन्ट्री’कोविड चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, पण लक्षणे नाहीत, अशांनी जिल्हा रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले आहे. महापालिकेचे कोविड केअर सेंटरही हाऊस फुल झाले आहे. त्यामुळे अनेकजण खाजगीचा आधार घेत आहेत. परंतु, तेथील खर्चही त्यांना पेलवत नाही़
कोविडची लक्षणे असलेल्यांनाही महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत़ परंतु, शहरातील एकाही खाजगी कोविड सेंटरने ही योजना घेतलेले नाही़ त्यामुळे कोविड रुग्णांनाही जनआरोग्य योजनेतून लाभ देता येत नाही़
-वसिम शेख, समन्वयक , महात्मा फुले जनआरोग्य योजना