कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन महिन्यांपासून बंद असलेला शहराच्या कोठी भागातील मार्केट यार्डचा फळ, भाजीपाला व फूल विभाग नियमांचे पालन करून सुरळीतपणे सुरू झाला आहे. टाळेबंदीत हा बाजार नेप्ती उपबाजार समितीमध्ये भरविण्यात आला होता. मात्र, सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांचे यामुळे चांगलेच हाल झाले. नेप्ती उपबाजार समिती बायपास रोडवर असून, या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने चालत असल्याने काही शेतकरी व हमाल बांधवांचे अपघात झाले. यामध्ये काहींचा जीव गेला, तर काही गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. येथे भाजीपाला मार्केट सुरू करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे सोयीच्या असलेल्या कोठी येथील मार्केटयार्डमध्येच हा विभाग योग्य नियोजन करून चालविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुख्य बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे काढून पार्किंगची सुविधा पुरविल्यास होणारी वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी टळणार आहे. शहरातील मार्केट हे शेतकरी व ग्राहक हिताचे व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्याची भावना सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, आडत व नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.