अहमदनगर : शिवसेनेचा महापौर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे युतीबाबत शिवसेना सकारात्मक दिसते आहे. युती झाली किंवा न झाली तरी अहमदनगर महापालिकेत महापौर हा शिवसेनेचाच होईल, असे ठाकरे यांनी बजावले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे निमंत्रण आल्याशिवाय स्वत:हुन पुढे न जाण्याची भूमिका भाजपने घेतली आहे.महापालिका निवडणुकीत ६८ पैकी सर्वाधिक २४ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला आता महापौरपदाचे वेध लागले आहेत. सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विजयाची सलामी दिली. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, विधानसभेचे उपाध्यक्ष आ. विजय औटी, उपनेते अनिल राठोड, संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे ठाकरे यांनी कौतुक केले. मंत्री कदम हे भाजपच्या मंत्र्यांशी चर्चा करतील. दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सकारात्मक व्हावी, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केल्याचे सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी सांगितले. मात्र भाजप सोबत आला नाही तरी महापौर शिवसेनेचाच होईल, यावरही ठाकरे यांनी भर दिल्याचे ते म्हणाले.शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी होणार आहे. बहुजन समाज पक्षाचे चारही नगरसेवक स्वतंत्र गटनोंदणी करणार असून तेही शिवसेनेसोबतच राहणार आहेत. त्यामुळे सेनेचे संख्याबळ २८ होईल. भाजपचे १४ सोबत आल्यास युतीचे नगरसेवक ४२ होतील. दरम्यान सर्वच पक्षांचे नगरसेवक सोमवारी (दि.१७) नाशिक येथील विभागीय आयुक्तकार्यालयात गटनोंदणीची प्रक्रिया पार पाडतील. दरम्यान भाजपही शिवसेनेसोबत युती करण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र अद्याप सेना नेत्यांची भाजप नेत्यांशी कोणतीही बोलणी झाली नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले. शिवसेना नेत्यांचे निमंंत्रण आल्याशिवाय पुढे जायचे नाही, अशी भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. यामुळे युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होण्याची शक्यता आहे.
युती असो की नसो...महापौर शिवसेनेचाच! :उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 6:02 PM