सुधीर लंके । अहमदनगर : साईबाबांचे जन्मस्थळ कोणते आहे? या वादात साईबाबांचे मूळ तत्वज्ञान आणि शिर्डीकरांची मूळ भूमिकाही दुर्लक्षित होण्याचा धोका आहे. साईबाबांनी स्वत:ची जात-धर्म कधीही जगासमोर आणलेला नाही. ‘सबका मालिक एक’ अशी त्यांची सर्वव्यापक भूमिका होती. साईबाबांची ही ‘धर्मनिरपेक्ष’ ओळख कायम राहणार का? हा कळीचा मुद्दा आता समोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय तोडगा काढतात याबाबत उत्सुकता आहे. देशात संतांची व देवांचीही जातपात शोधण्याचे प्रयत्न झाले. शिर्डीतील साईबाबांनी मात्र आपली जात-धर्म कधीही भक्तांना कळू दिला नाही. त्यांना हिंदू, मुस्लिम असे सर्वधर्मीय भाविक मानतात. साईबाबा हिंदू पद्धतीप्रमाणे अग्नीही पेटवायचे व मशिदीतही रहायचे. हिंदू पद्धतीने आज साईमंदिरात आरती होते. तसेच सकाळी दहा वाजता मुस्लिमही प्रार्थना करतात. शिर्डीत रामनवमी साजरी होते तसा संदलही असतो. नाताळात साई मंदिरावर रोषणाई केली जाते. हे तीर्थक्षेत्र सर्व धर्मीयांना आपले वाटते. साईबाबांचे जन्मस्थळ शोधल्यामुळे त्यांच्या रक्ताचे वंशज कोण आहेत, म्हणजेच त्यांची जात-धर्म काय? याचा शोध घेतला जाईल अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे त्यांचे जन्मस्थळ शोधण्यास शिर्डीकरांचा विरोध आहे. शिर्डी संस्थानने काढलेल्या साईचरित्राच्या मराठी आवृत्तीत साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख नाही. काही इंग्रजी आवृत्तीत तसा उल्लेख झाला होता. मात्र तो उल्लेखही नंतर संस्थानने वगळला.बहुतांश देवस्थानांचे विश्वस्त मंडळ नियुक्त करताना विशिष्ट धर्माचे विश्वस्त घेतले जातात. शिर्डी संस्थानमध्ये मात्र अशी अट नाही. साईबाबांची धर्मनिरपेक्ष अशी ओळख शिर्डीकरांनी व सरकारनेही आजवर जपली आहे. त्यामुळेच त्यांचे जन्मस्थळ शोधण्यास शिर्डीकरांचा विरोध आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीला निधी द्या पण, तो जन्मस्थळाच्या नावाने नको अशी शिर्डी ग्रामस्थांची भूमिका आहे. त्याऊलट साईबाबा जर पाथरीचे असतील तर पाथरीचा विकास का नको? त्यांचे जन्मस्थळ का नाकारले जात आहे, अशी पाथरी येथील ग्रामस्थांची भूमिका आहे. यात दोन्ही बाजूने राजकीय हस्तक्षेपही सुरु झाल्याचा आरोप भाविक करु लागले आहेत. त्यामुळे राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या वादात काय तोडगा काढणार ? याबाबत उत्सुकता आहे. साईबाबांचा जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही? हा कळीचा मुद्दा या वादामागे दडलेला आहे. शिर्डीबाबत आजवर झालेले वाद २००६ साली शिर्डीच्या मंदिरात साईबाबांच्या मूर्तीला सोन्याचे सिंहासन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘साईबाबांना कशाला हवे सोन्याचे सिंहासन?’ अशी टीका त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यावरुनही वाद उद्भवला होता. शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी शिर्डीचे साईबाबा देव नाहीत, असे वादग्रस्त विधान केले. त्यामुळेही वाद निर्माण झाला होता.साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ करताना २०१७ मध्ये विद्यमान विश्वस्त मंडळाने मंदिरात भगवे फलक लावले तसेच स्तंभ उभारुन त्यावर त्रिशूल लावला, तेव्हाही आक्षेप घेतले गेले. मंदिराचे भगवेकरण सुरु झाल्याचा आरोप त्यावेळी ग्रामस्थांनी केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीचा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला होता.
सरकारने तथ्य न तपासता पाथरीला निधी देण्याची घोषणा केली. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळावरुन वाद निर्माण झाला आहे. हा वाद निरर्थक आहे. सरकारने पाथरीच्या विकासाला निधी द्यावा मात्र तो साईबाबांच्या जन्मस्थळाच्या नावाने नको, असे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी सांगितले.
साईबाबा केवळ शिर्डीचे नाहीत. ते सर्व विश्वाचे आहेत. हे असे संत आहेत की ज्यांनी जात-धर्म पाळला नाही. त्यामुळे त्यांचे जन्मस्थळ व जात शोधून सरकार नेमका काय संदेश देऊ पाहत आहे? साईबाबा सर्व जाती-धर्माचे होते. जन्मस्थळाचा वाद काढून त्यांची ही ओळख पुसली जात आहे यास आमचा विरोध आहे. हा विकासाचा नव्हे सामाजिक संदेशाचा मुद्दा आहे, असे शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी सांगितले.