श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मकर संक्रांतीदिनी शहरात मोरगे वस्ती भागामध्ये पतंग उडविताना भूषण शरद परदेशी नावाचा तरुण तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळला. त्याला नगर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
जखमी तरुण हा बावीस वर्षे वयाचा आहे. त्याला प्रारंभी शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता स्थानिक लोकांनी हलविले होते. मात्र तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर भूषण याला तातडीने नगरला पाठविण्यात आले. भूषण हा अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. तो मित्रांसमवेत गच्चीवरून पतंग उडवित असताना तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला.
यात त्याला गंभीर दुखापत झाली. शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी रविवारी पतंग उडविण्यासाठी तरुणांची गर्दी उडाली होती. पोलिसांनी स्पीकर लावून पतंग उडविण्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर खबरदारीची उपाययोजना करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. पतंग उडविताना शहरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. संध्याकाळी उशिरा त्याला नगर येथील खासगी रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली. त्याच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त होत आहे.