घारगाव : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान अंगावर वीज कोसळून महिलेेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात चार शेळ्यांचाही मृत्यू झाला.
शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या असता अचानक विजांचा कडकडाट झाल्याने ही घटना घडली. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. साकुर येथून काही अंतरावर हिवरगाव पठार येथे राहत असलेल्या अनिता उर्फ मुक्ताबाई वणवे घरापासून काही अंतरावर शेतात शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेल्या होत्या. पाऊस सुरू होण्याआधीअचानक विजेचा कडकडाट झाला. याचवेळी अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.काही वेळाने पाऊस सुरू झाला. घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे,गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख,आदिनाथ गांधले, किशोर लाड,गणेश तळपाडे,युवासेना उपतालुका प्रमुख जनार्दन नागरे,सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वणवे,ग्रामसेवक विजय आहेर आदींनी घटनास्थळी भेट दिली. घारगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश टकले हे करत आहे.