लोकमत न्यूज नेटवर्क
आकाश येवले
राहुरी : मुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या बारागाव नांदूर नदीपात्रातून राजरोसपणे शेकडो ब्रास वाळू चोरून नेली जाते. चोरटी वाळू वाहतुकीसाठी गावातील अंतर्गत रस्त्यांसह मुळा धरणाच्या मार्गाचाही वापर होतो. मुळा धरणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचविणाऱ्या वाळू तस्करांना पोसतोय कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हे अवैध धंद्याचे केंद्र बनले आहे. दुचाकी चोरी, शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप व केबल चोरीसह वाळू तस्करांनाही पाठबळ देणाऱ्या गावात बारागाव नांदूर गावाने अग्रक्रमांक घेतला आहे. गावामध्ये दैनंदिन शेकडो ब्रास वाळूचोरी होत असतानाही महसूल, पोलीस प्रशासनाला ते दिसेनासे झाले आहे. ग्रामस्थही वाळू तस्करांच्या कृत्याला छुपा पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे. यामुळे मुळा नदीपात्र उजाड होत आहे. बारागाव नांदूर परिसरात सुरू असलेला हा अवैध वाळू उपसा रोखणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गावात पाहुणे म्हणून यायचे आणि हळूहळू गावातच दादागिरी, हाणामारी करून गावातील लोकांना त्रास द्यायचा ही प्रथा गावात नित्यानेच सुरू आहे. पुढे हेच पाहुणे वाळू तस्करीकडे वळले. त्यांना राजकीय पाठबळही मिळाले. आता तर त्यांचा गावठी बंदुकीच्या जोरावर हैदोस सुरू आहे. अजूनही चार ते पाच वाळू तस्करांच्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांनी मुळा नदीपात्रातील जागेमध्ये आपला हिस्सा वाटून घेतला आहे. रात्रीच्या वेळी हे टोळके नदीपात्रातच असते. केनीच्या साहाय्याने वाळू तस्करांच्या गाड्या भरून देतात. दररोज लाखो रुपयांची वाळू रोज उचलली जाते. ग्रामस्थांसह प्रशासनही हा प्रकार उघड्या डोळ्याने पाहत आहे. एवढेच नव्हे तर वाळू तस्करांची सर्व कृत्ये बारागाव नांदूर ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद होतात, परंतु कारवाई होत नाही. मुळा धरणाच्या भिंतीसह गावातील नदीपात्रालाही वाळू तस्करांच्या दृष्कृत्याचा धोका आहे. परंतु तरीही संबंधित वाळू तस्करांना नेमके पाठबळ देतो कोण? त्यांना पोसतोय कोण? प्रशासन का दुर्लक्ष करतेय, या सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत.
-----------
त्या मातीमिश्रित प्रकरणातही काळेबेरे
बारागाव नांदूर गावात मातीमिश्रित वाळूचा लिलाव झाला. ठेकेदारासह काही गावांतील सामाजिक नेत्यांनीही हात धुऊन घेतल्याने हजारो ब्रास वाळूचा उपसा नदीपात्रातून झाल्याची तक्रार आहे. सीसीटीव्ही पाहणी करून कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु अजून कारवाई झालेली नाही.
----------
बारागाव नांदूर गावात ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास नक्की कारवाई करू. चोरटी वाळू वाहतूक रोखण्यासाठी अनेकदा मुळा पात्रात गेलो. परंतु गावातील खबऱ्यांनी माहिती दिल्याने कारवाई झाली नाही. मातीमिश्रित उपसा करताना सीसीटीव्हीचे नियम नसतात. त्यामुळे मातीमिश्रित लिलावाबाबत तक्रारी येताच उपसा थांबविण्याचे आदेश दिले होते.
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी