सुधीर लंकेअहमदनगर : जलयुक्त शिवार योजनेचा डांगोरा पिटलेला नगर जिल्हा सध्यातरी पूर्णत: टँकर ठेकेदारांच्या हवाली गेल्याचे चित्र आहे. टँकरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता व प्रशासनाची बेफिकीरी असल्याचे भयानक वास्तव ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे. अनेक टँकरचालकांकडे ‘लॉगबुक’च आढळले नाही. तर ‘जीपीएस’ प्रणालीचे नियंत्रण नेमके कोण करते? हे प्रशासनालाच ठाऊक नाही. त्यामुळे टँकर व्यवस्थेचा हिशेब कुणाकडे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राज्यात टँकरमुक्तीच्या वल्गना झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात टँकर शिवाय तहान भागताना दिसत नाही. सरकारकडे टँकरच नसल्याने खासगी ठेकेदारांची नियुक्ती करुन टँकरचा पुरवठा करावा लागतो. नगर जिल्ह्यात आजमितीला ७७१ टँकर सुरु आहेत. त्यामध्ये केवळ १८ टँकर सरकारी, तर तब्बल ७५३ टँकर खासगी ठेकेदारांचे आहेत.टँकरच्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्ह्यात सात ठेकेदार संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर अशी त्यांची ठेक्याची मुदत आहे.टँकर कोठे भरायचा व तो कोणत्या गावांत पोहोचवायचा याचे सर्व वेळापत्रक हे तालुक्याचे गटविकास अधिकारी निश्चित करतात. त्याप्रमाणे खासगी ठेकेदारांनी टँकर पुरवठा करणे आवश्यक आहे. त्याबदल्यात या ठेकेदारांना दर किलोमीटरमागे वाहनाचे, इंधनाचे व पाण्याच्या टाकीचेही भाडे मिळते. मात्र, टँकर ठरल्याप्रमाणे गावांमध्ये जातात का? याबाबत सावळा गोंधळ आहे.टँकर गावात पोहोचतात की नाही हे तपासण्यासाठी ‘लॉगबुक’ नावाचे रजिस्टर प्रत्येक टँकरमध्ये असते. त्या रजिस्टरवर प्रत्येक गावात पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन महिलांची स्वाक्षरी घेणे बंधनकारक आहे. त्यानंतर ग्रामसेवकाची स्वाक्षरी होऊन टँकरची बिले पंचायत समितीत जातात.‘लॉगबुक’ शिवाय टँकरच्या फिरतीवर लक्ष ठेवण्यासाठी आॅनलाईन ‘जीपीएस’ यंत्रणाही प्रत्येक टँकरमध्ये बसविण्यात आलेली आहे. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही यंत्रणा नीट कार्यान्वित नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ प्रतिनिधींनी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये जिल्ह्यात समोर आले आहे.प्रगतशील जिल्हा राज्यात तिस-या स्थानीटँकरच्या संख्येत नगर जिल्हा आघाडीवर जात आहे. राज्यात आजमितीला सर्वाधिक टँकर औरंगाबाद (१०४८) जिल्ह्यात आहेत. त्याखालोखाल बीड (८३०) व नगर (७७१) जिल्ह्याचा समावेश होतो.या संस्था आहेत ठेकेदारश्री गणेश सहकारी मोटार वाहतूक संस्था,शेवगाव- पाथर्डीगाडे ट्रान्सपोर्ट- पाथर्डीजामखेड वीट उत्पादकांची मोटार वाहतूक संस्था जामखेड- कर्जतलक्ष्मीमाता मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस भोकर- नगरवैभव लॉजिस्टिक नाशिक- संगमनेरसाई सहारा इन्फ्रा अॅण्ड फॅसिलिटी पारनेर-श्रीगोंदा, पारनेरगाडे ट्रान्सपोर्ट- शिर्डी-श्रीरामपूर