शरद शिंदे
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणारमध्ये वाड्या-वस्त्यांसह गावठाणातही तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही टँकरची ना फलक, ना नोंदवही अशी धक्कादायक स्थिती असून पाण्याचे टँकर रामभरोसे धावत आहेत.शासकीय पाणीपुरवठा, मंजूर गावाचे नाव, पाण्याचा उद्भव, मंजूर खेपा असा उल्लेख असलेला फलकही नाही, खेपांची नोंदवही टँकर मालकाच्या घरी असते. नोंदवहीवर आठवड्यातून एकदा जमेल तसे पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीतील महिलांच्या घरी जाऊन सह्या घेतल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाला आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बहुतांश गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर सुरू झाल्यापासून एकाही टँकरला शासकीय पाणीपुरवठा असा उल्लेख असलेला फलक लावला नाही. त्यामुळे टँकर शासकीय आहे की खासगी? असा संभ्रम निर्माण होत आहे. तसेच तेच टँकर मंजूर खेपा धावतपळत पूर्ण करून फळबागांना पाणीपुरवठा करत असल्याचेही प्रकार अनेक गावांमध्ये सुरु आहेत.