संतोष टेमकसोनई : नेवासा तालुक्यातील मोरे चिंचोरे परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सुरू असलेल्या टँकरच्या दोन खेपाही कमी पडत आहेत. गावठाणमध्ये राहणाऱ्यांपेक्षा वाड्यावस्त्यांवर राहणारे अधिक आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला कसरत करावी लागते.मोरे चिंचोरेला पाणी पुरवठा करणाºया टँकरवर फलक नव्हता. लॉगबुकवर १ मे ते ९ मेपर्यंतची नोंदच आढळून आली नाही. मात्र पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावची लोकसंख्या २ हजार ३७६ इतकी असून २२ हजार लिटर पाणी दररोज दिले जाते. ३१ मार्चपासून गावाला टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पांढरीपूल येथे असलेल्या मिरी-तिसगाव पाणी योजनेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून टँकर भरले जातात. पाणी पुरवठ्याचा ठेका भोकर (ता. श्रीरामपूर) येथील लक्ष्मीमाता मिल्क या संस्थेने घेतला आहे. एम.एच. १७ टी ७९९१ या क्रमांकाच्या टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.३० एप्रिलपर्यंतचे लॉगबुक पूर्ण असून ते पंचायत समितीत पाठविले आहे. शुक्रवारी नवीन लॉगबुक मिळाल्यामुळे १ मे ते ९ मे पर्यंतच्या नोंदणी व सह्या अपूर्ण आहेत. ग्रामस्थांना पाणी वेळेवर देण्याचा प्रयत्न करत आहे. -बी. एस. सुंबे, ग्रामसेविका, मोरेचिंचोरे
टँकर गेले कुण्या गावा ? मोरेचिंचोरेत दोन खेपा कमी : लॉगबुकवर नोंदीच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:48 PM