याबाबत अवसक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, संगमनेर शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गावर होणारी कोंडी सोडविण्यासाठी शहराच्या बाहेरून नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्ग करण्यात आला. त्यामुळे शहरात होणारी वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. १३२ के.व्ही.पासून अकोलेकडे जाण्यासाठी बाह्यवळण रस्ता आहे. तसेच अहमदनगरकडे जाणारी अवजड वाहने बाहेरच्या मार्गाने वळविण्यात येतात. त्यामुळे अवजड वाहने शहरातून जाण्याचे प्रमाण पूर्वीपेक्षा खूपच कमी झाले आहे.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते संगमनेर खुर्दपर्यंत नऊ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चौपदरीकरण करताना रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित आहे. त्यानुसार मोजणी करत खुणा करण्यात आल्या आहेत. हा रस्ता शहरातून जात असल्याने परिसरात काहींची घरे असून अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. कोरोनामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून परिस्थिती बिकट बनली असताना त्यांचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे.
रुंदीकरणात घरे, दुकानांवर खुणा केल्या असल्याने आधीच कोरोनाच्या भीतीत जगत असलेले नागरिक आता काळजीत पडले आहेत. वहिवाटीनुसार स्वमालकीच्या जागेवर पक्के बांधकाम केलेल्या नागरिकांवर अन्याय होणार आहे. शहरातून चौपदरी रस्ता करण्याचा घेतलेला निर्णय हा तुघलकी असून त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडतील, अशीही नागरिकांमध्ये भीती आहे. अनेक संस्था, आस्थापना यांचेही नुकसान होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी विचार करावा, असेही म्हटले आहे.
---------
माहिती देण्यास असमर्थता
संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदीकरणासह सुशोभिकरणासाठी २४ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या संदर्भाने अधिक माहितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांच्यांशी मोबाइलद्वारे संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. माहिती अधिकार कायद्याचा वापर करत याबाबत माहिती घ्यावी, असे त्यांनी सुचविले.
------------