शेवगाव : पाच वर्षांपूर्वी अमित शहा यांना कोणी ओळखत तरी होते का? ते आज महाराष्ट्रात येऊन विचारतात, शरद पवारांनी काय केले. आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपला केला. शेवगाव-नेवासा मतदातसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी बोधेगाव येथे जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अरुण लांडे, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, शेतक-यांच्या हिताचे हे सरकार नाही. ठराविक लोकांना आणि मीडियाच्या काही लोकांना हाताशी धरले तर सरकार स्थापन करता येऊ शकते हे या लोकांना वाटते. शेतक-यांच्या डोक्यावर थोडे फार कर्ज बाकी असेल तर त्याची घरातील भांडी, कुंडी बाहेर काढली जातात. ७० टक्के शेतक-यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. हे सरकार आपल्या हिताचे नाही. मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. मी तालीम संघाचा अध्यक्ष आहे. सगळे पहिलवान तयार आहेत. कुस्ती खेळायला आलेल्या पहिलवानांची आम्ही काळजी घेतो. भाजपवाल्यांना माझ्या नावाशिवाय झोप येत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील युवक राजेश तलवार या शेतक-याचा आत्महत्येचा संदर्भ देत आम्ही चौकशी केली तर कळले तो भाजपचा प्रचार करीत होता. काही तरी मिळेल याची अपेक्षा होती. मात्र काही मिळाले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. हीच परिस्थिती भाजप कार्यकर्त्यांची आहे. किल्ल्याच्या मुद्यावरही यावेळी पवारांनी सरकारला लक्ष्य करीत टीका केली.
पाच वर्षांपूर्वी अमित शहांना कोण ओळखत होते?; आम्ही गुजरातपेक्षा महाराष्ट्रात जास्त कामे केली-शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:05 PM