अहमदनगर: नगर शहरात तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले. या कारवाईला पाच दिवस उलटले तरी या डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार होण आहे? हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.
राठोड यांच्या पथकाने २६ ऑक्टोबर रोजी शहरातील जीपीओ चौकातील छावणी कॉम्प्लेक्स परिसरात छापा टाकला. यावेळी एक टँकर व ट्रकमधून १ हजार ९३७ लिटर बनावट डिझेल जप्त केले. यावेळी बनावट डिझेलची विक्री करणारा गौतम वसंत बेळगे याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे हे करत आहेत. शुक्रवारी त्यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पंचनाम करत तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले. हे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी गौतम बेळगे याला शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळाली आहे़ गेल्या पाच दिवसांपासून या गुन्ह्याचा तपास एकाच आरोपीभोवती फिरत आहे़ एकेकाळी जिल्ह्यात नाप्ता भेसळीचा मास्टरमाईंड असलेला राहुरीचाच आरोपी या डिझेल रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे लपून राहिलेले नाही़ गुजरात ते मुंबई आणि राहुरी अशा माध्यमातून येणारे हे बनावट डिझेल जिल्ह्यात आणून विकले जात आहे़ पोलीस मात्र या गुन्ह्यातील सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डिझेलसह ट्रक हेराफेरीचेही रॅकेट
नगर शहरात बनावट डिझेल विक्रीचे प्रकरण समोर आल्यानंतर ट्रकच्या क्रमांकांमध्ये हेराफेरी करून इन्शुरन्स कंपन्यांकडून लाखे रुपये लाटण्याचा प्रकारही समोर आला आहे. विशेष म्हणजे बनावट डिझेल रॅकेटमधील सूत्रधारांचाच या ट्रक रॅकेटमध्येही सहभाग असल्याचे समोर येत आहे. बनावट डिझेलवर कारवाई झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांच्या पथकाने नगर शहर व परिसरातून बनावट क्रमांकाच्या पाच ट्रक जप्त केल्या आहेत. ट्रक विकत घेतल्यानंतर काही दिवसाने तिची चोरी झाली आहे. अशी फिर्याद पोलीस ठाण्यात द्यायची. तोपर्यंंत ती ट्रक लपून ठेवायची. काही दिवसानंतर त्या ट्रक चोरीचा तपास लागत नाही,असा तपासी अधिकाऱ्याकडून ब फायनलच्या अहवालाची प्रत घ्यायची. हिच प्रत आरटीओ व इन्शुरन्स कंपनीला द्यायची. त्यानंतर इन्शुरन्स कंनीकडून पैसे घ्यायचे. असे हे रॅकेट आहे. आता या प्रकरणाचा तपास आरटीओ विभागाकडून सुरू आहे.
नगर परिसरातून बनावट क्रमांकाच्या जप्त केलेल्या ट्रकबाबत सविस्तर तपास सुरू आहे. या प्रकरणात येत्या काही दिवसांत सविस्तर माहिती उपलब्ध होईल.
-संदीप खडसे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नगर