अहमदनगर : शासनाच्या फेज-२ पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला जात असतानाच दरवर्षी टँकरवर लाखो रुपये खर्च होत असून, टँकरची गरज सर्वसामान्यांची आहे की राजकारण्यांची असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी केंद्र शासनाकडून फेज-२ आणि त्यानंतर अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सुमारे ११६ कोटी रुपये खर्चून फेज-२ पाणी योजनेचे काम सुरू आहेत. तसेच सुमारे १२४ कोटींची अमृत पाणी योजना राबविण्यात येत आहेत. या दोन्ही योजनांची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. फेज-२ पाणी योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे. असे असताना सन २०१० ते २०२१ या काळात टँकरच्या खर्चात एका रुपयाची कपात झालेली नाही. उलटपक्षी टँकरवरील खर्चात वाढ होत असून, गेल्या ११ वर्षांत टँकरने पाणीपुरवठा करणाऱ्या दीपाली ट्रान्सपाेर्टला अदा केले गेले आहेत, अशी माहिती माहिती अधिकारात महापालिकेकडून देण्यात आली आहे.
....
सारसनगर कल्याण रोड भागाला टँकरने पाणीपुरवठा
सन २०१० मध्ये शहरातील काही भागात पाणीपुरवठा हाेत नव्हता. वाढत्या लोकवस्तीमुळे नळाद्वारे पाणी देणे शक्य नव्हते. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. परंतु, पाणी योजना आल्याने अनेक भागातील टँकर बंद होऊन सध्या सारसनगर व कल्याण रोड भागातच फक्त टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच ज्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशा भागात नागरिकांच्या मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, हे प्रमाण अत्यल्प आहे.
...
दहा वर्षांपासून दीपाली ट्रान्सपाेर्टलाच ठेका
ग्रामीण भागात टँकरने पाणीपुवठा करण्यासाठी दरवर्षी निविदा मागविण्यात येतात. महापालिकेत मात्र गेल्या दहा वर्षांपासून एकमेव दीपाली ट्रान्सपोर्ट या संस्थेलाच टँकरने पाणीपुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला असून, या संस्थेला कोट्यवधींची बिले अदा करण्यात आलेली आहेत. ही संस्था शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांशी संबंधित असून, महापालिकेत सत्ता कुणाचीही असो, टँकरचा ठेका मात्र दीपाली ट्रान्सपोर्टकडे असतो, हे विशेष.
..
असा झाला खर्च
सन २०१८- ८० लाख
सन २०१९-९० लाख १२ हजार
सन २०२०- ८५ लाख १० हजार