अहमदनगर : देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी नगर येथे केली.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधकांना संपविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ही भूमिका यापूर्वी कधीही स्वीकारली गेलेली नाही. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना अडचणीत आणण्याची भाषा करीत आहेत. संरक्षण विभागातील गैरव्यवहाराचे पुरावे देणाऱ्यांना धरून आणले जाईल. परदेशात जो एजंट आहे, त्याला आणत आहोत. त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. आम्ही ती लवकरच जाहीर करणार असून, विरोधकांना आम्ही धडा शिकवणार आहोत, असे पंतप्रधान भाषणातून सांगत आहेत. मी ते करून दाखविणारच माझे नाव मोदी आहे, असे ते सांगत आहेत. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर गैरव्यवहारात परदेशातील मिशेल मामा आता भारतात आला आहे. त्याची चौकशी होईल. गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान जे सांगत होते, मिशेलमामा आता काय बोलणार ते बघाच. या प्रकरणात काँग्रेसच्या सोनिया गांधी यांचे नाव मिशेलने घेतल्याचे ईडीने सांगितले आहे. म्हणजेच सत्तेचा एवढा मोठा गैरवापर केला जात आहे. त्याचा अतिरेक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हे देशावरील मोठे संकट असून, यासंदर्भात संसदेच्या येणा-या अधिवेशनात सर्व विरोधकांना एकत्र करून आवाज उठविणार असल्याचे पवार म्हणाले़ सरकारने आरबीआय, न्यायव्यवस्था आणि सीबीआय या सर्व संस्थांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे देशाची आणिबाणी धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.शेतकरी कर्जमाफीची पंतप्रधानांकडून थट्टातीन राज्यांतील सरकारांनी शेतक-यांना कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या राज्यांना अर्थिक मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेणे अपेक्षित आहे. मात्र देशांच्या पंतप्रधानांनी या कर्जमाफीची लॉलीपॉप, असे म्हणून एक प्रकारे थट्टा केली आहे. शेतक-यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली असताना देशाच्या पंतप्रधानांनी कर्जमाफीबाबत, असे विधान करणे योग्य नाही़, असेही पवार म्हणाले.
सोनिया गांधींचे नाव घेणाऱ्या मिशेलमामाचा बोलविता धनी कोण?- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 9:14 PM