अहमदनगर : शहरासह उपनगरातील प्रमुख चौकांत नेत्यांचे वाढदिवस, क्लासेस, दुकानांचे शेकडो अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, हे होर्डिंग हटविण्याची तसदी महापालिका प्रशासन घेत नाही. त्यामुळे चौकांसह महामार्ग ही अनधिकृत होर्डिंग ने झाकाळून गेले आहेत.
महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी जाहिरातींचे फलक लावण्यास परवानगी दिलेली आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदर संस्थेने २२५ ठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. त्याबदल्यात महापालिकेला भाडे मिळते. याशिवाय दिल्लीगेट, नेप्ती नाका, सक्कर चौक, जीपीओ चौक, कोठला, पोलीस अधीक्षक चौक, तारकपूर, पत्रकार चौक, प्रोफेसर चौक, सावेडी नाका, पाईपलाईन रोड, तपोवन रोड, कॉटेज कॉर्नर आदी ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी मोठमोठे जाहिरात फलक उभारलेले आहेत. तसेच शहरातून मनमाड, औरंगाबाद, पुणे, कल्याण, सोलापूर हे प्रमुख महामार्ग जातात. हे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर मोठमोठे जाहिरात फलक उभारण्यात आले असून, याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शहरातील चौकांसह महामार्गही जाहिरात फलकांनी विद्रूप झाले आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
.....
या ठिकाणांकडे लक्ष देणार कोण
प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, सावेडी नाका, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड, तपोवन रोड, अप्पू हात्ती चौक, न्यू आर्टस कॉलेज, जीपीओ चौक, कोठला, कोठी ते यश पॅलेस रस्ता, नेप्ती नाका ते दिल्लीगेट रस्ता, बालिकाश्रम रोड, नागापूर पूल, औरंगाबाद रोड आदी ठिकाणी अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत.
.....
काय होऊ शकते कारवाई
अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश आहेत. जाहिरात फलकावर असलेल्या मजकुराचा अभ्यास करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची तरतुद आहे. त्यानुसार महापालिका कारवाई करू शकते.
....
वर्षभरात एकही कारवाई नाही
न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचा आदेश आहे. परंतु ,या आदेशाची महापालिकेकडून अंमलबजावणी केली गेली नाही. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून जाहिरात फलक काढून घेतले जातात. परंतु, कायदेशीर कारवाई केली गेली नाही. फलक लावल्यास कोणतीही कारवाई होत नसल्याने अनधिकृत होर्डिंग्जची संख्या वाढली आहे.
.............................