अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासाठी राज्यस्तरावर विचारमंथन सुरु झालेले असताना हे लोण लवकरच जिल्हास्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. मोदी लाटेआड लपण्याऐवजी या पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार, याविषयी कुजबुज सुरु झाली आहे. पाडापाडी झाली, याबाबतही त्यांच्यात दुमत नसल्याचे दिसून आले. मात्र यासाठी जबाबदारी निश्चित करुन कारवाई केली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष आहे. या सर्व घडामोडीत नेत्यांप्रमाणेच संघटनात्मक स्तरावर पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन पद सोडले पाहिजे, अशी कुजबुज त्यांचे पक्षातील विरोधक करु लागले आहेत. नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांचा २ लाख ९ हजार एवढ्या विक्रमी मताने पराभव झालेला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या श्रीगोंदा तालुक्यातून विरोधी भाजपाचे उमेदवार दिलीप गांधी यांना विक्रमी ५८ हजारांचे मताधिक्य मिळालेले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जिल्हाध्यक्ष शेलार उमेदवार राजळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यात निवडणुकीच्या निकालानंतर लोकसभा मतदारसंघात विरोधी उमेदवार गांधी यांना सर्वाधिक मताधिक्य श्रीगोंदा तालुक्यातून मिळालेले आहे. यामुळे राजळे यांची चांगलीच पीछेहाट झाली आहे. यामुळे दक्षिण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. याचे खापर स्थानिक आमदारांसह पक्षाच्या पदाधिकार्यांवरही फोडले जात आहे. हीच अवस्था शिर्डी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या श्रीरामपूर मतदारसंघात झाली आहे. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या वडाळी या गावात भाजपाचे उमेदवार गांधी यांना १६ मतांची आघाडी मिळाली असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळाले असून याची कारणमीमांसा योग्य वेळी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा पराभवाची नैतिक जबाबदारी कोण स्वीकारणार?
By admin | Published: May 19, 2014 11:44 PM