सुदाम देशमुखअहमदनगर : महापालिकेची निवडणूक म्हटले की एखादी मोठी सभा घेवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची प्रथा यंदा राजकीय पक्षांनी मोडीत काढली आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. विशाल गणपतीची आरती करून आणि याच मंदिर परिसरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्याची नवी प्रथा यंदा बघायला मिळाली. सर्वच राजकीय पक्षांना बहुमताचा आकडा गाठण्याबाबत धास्ती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हालाच सत्ता द्या, असे साकडे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विशाल गणपतीला घातले. त्यामुळे हा विशाल गणपती आता नक्की कोणाला पावणार? हे दहा तारखेला कळणार आहे.श्री. विशाल गणपतीची मूर्ती महाराष्ट्रात सर्वाधिक उंचीची असल्याचा दावा केला जातो. मूर्ती ही वर्धिष्णू असल्याने सर्वांचेच श्रद्धास्थान आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी विशाल गणपतीला साक्षी ठेवून प्रचाराचा नारळ वाढविला. भारतीय जनता पक्षाने त्यांचे मंत्री आणि निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी सामुदायिक आरती केली. आधी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नारळ वाढविले. काँग्रेसचे युवक नेते डॉ. सूजय विखे उशिरा पोहोचल्याने पुन्हा एकदा आ. संग्राम जगताप आणि डॉ. विखे यांच्या हस्ते एकत्रित नारळ वाढविले. शिवसेनेच्या नेत्यांनीही महाआरती करून गणपतीला साकडे घातले. शिवसेनेने गणपतीसोबत २४ नोव्हेंबरला रामाचीही सामुदायिक आरती करून राममंदिरासाठीबी साकडे घातले. अनेक उमेदवारांनीही त्यांचे प्रभागातील विकासाचे जाहिरनामे गणपतीच्या चरणी अर्पण केले. निवडून येवू दे....काय करणार ते बहुतेक गणपतीच्या कानात सांगितले असावे.श्री. विशाल गणपतीची मूर्ती जशी महाकाय आहे, तसेच गणपतीचे कानही सुपासारखे मोठे आहेत. या कानात मात्र गणपतीला नगरकरांच्याच समस्या ऐकू येत असाव्यात. नगरमध्ये जे काही ऐकण्यासारखे आहे, ते फक्त प्रश्न आणि प्रश्नच! या समस्या ऐकून गणपतीला तरी कसे बरे वाटणार? म्हणूनच राजकीय पक्षांनी देवाची आळवणी करून वातावरण मंगलमय केले. समस्यांपेक्षा आम्हाला सत्ता द्या, अशीच आळवणी प्रत्येक नेत्यांनी गणपतीला केली. त्यामुळे आता सत्ता तरी कोणाच्या पारड्यात द्यायची, याबाबत गणपतीला प्रश्न पडला असणार. म्हणूनच हे काही आपले काम नाही, ते काम नगरच्या जनतेकडे सोपविले आहे, त्यांच्याकडेच जा, असा आदेश गणपतीने दिला असावा. त्यामुळे आता उमेदवार मतदारांनाच देव मानू लागले आहेत. ‘मतदार दिसला की पड पाया’, असा धडाका सुरू ठेवला आहे.
विशाल गणपती कोणाला पावणार ? जनताच झाली देव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:03 PM