साईसंस्थानच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी?; काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच, पडद्यामागील हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 12:47 PM2021-06-13T12:47:18+5:302021-06-13T12:47:47+5:30
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायकचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे.
- प्रमोद आहेर
शिर्डी : राज्यातील प्रमुख देवस्थान असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच असुन हे पद खेचून आणण्याबरोबरच चांगला चेहरा देण्याचे आव्हान या पक्षांसमोर आहे. उच्च न्यायालयाने विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साईमंदीर उघडण्यापुर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगुल वाजेल अशी चिन्हे आहेत. यामुळे पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीचे सरकार आहे. सिद्धीविनायकचे अध्यक्षपद सेनेकडे असल्याने साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी दावेदार आहे. राष्ट्रवादीकडून कोपरगावचे आमदार आशुतोष काळेंचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. स्थानिक, सामाजिक व राजकीय परिस्थीती माहिती ही काळे यांची जमेची बाजु आहे. मात्र त्यांच्या कारखान्यात होणारी मद्य निर्मीती धार्मिक संस्थानच्या दृष्टीने नैतिकतेचा मुद्दा होवू शकतो. आमदार रोहित पवार यांच्याही नावाची चर्चा असुन पवार संस्थानसाठी नवखे आहेत मात्र त्यांना मोठ राजकीय पाठबळ आहे.
याशिवाय कोविड मध्ये उल्लेखनिय काम करणारे आमदार निलेश लंके यांच्या नावासाठी जनतेतुन होणारी मागणी ही लंकेची जमेची बाजु आहे. सामान्य कुटूंबातील असलेल्या लंके यांना मात्र अध्यक्ष होण्यासाठी पुरेसे राजकीय पाठबळ नाही. काँग्रेस कडून आमदार डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची नावे चर्चेत आहेत. स्थानिक परिस्थीतीची जाण असली तरी ते महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जवळचे नातेवाईक असल्याने एकाच कुटूंबात अनेक पदे देतांना विचार होवू शकतो.
श्रद्धा व विकासाची सांगड घालणारा, भक्तांच्या समस्या जाणून घेणारा, शिर्डीच आंतराष्ट्रीय महत्व वृद्धींगत करतांनाच सामाजिक दृष्टीकोण असणारा अध्यक्ष साईसंस्थानला मिळावा अशी भाविकांची सदैव अपेक्षा असते. सुदैवाने दोन्ही पक्षांकडे भाविकांना भावतील व विकास कामांसाठी धावतील असे अनेक डायनॅमिक चेहरे आहेत. त्यादृष्टीने निवड होण्यासाठी संबधित पक्षाकडे मात्र इच्छाशक्तीची गरज आहे. एकुणच संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे रविंद्र मिर्लेकर यांचे नाव निश्चीत असुन विश्वस्त पदासाठी मुंबई, मालेगाव, बीड, राहुरी येथील पदाधिकाºयांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसची नावेही लवकरच निश्चीत होणार असुन संगमनेर, श्रीरामपुर व शिर्डीतील प्रत्येक एक विद्यमान पदाधिकारी तर राष्ट्रवादीकडून शिर्डी, कोपरगाव व श्रीरामपुर मधुन जिल्हा व राज्यस्तरीय तीन आजी-माजी पदाधिकाºयांची नावे चर्चेत आहेत.