केडगाव : नगर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी लागणार आहे. सर्वत्र चुरशीच्या लढती झाल्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातच काट्याची टक्कर होत असून गुलाल कोण उधळणार याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.
नगर तालुक्यातील ५९ पैकी तीन ग्रामपंचायत निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. आता ५६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सर्वच गावात दुरंगी आणि चुरशीच्या निवडणुका झाल्याने निकालाचा अंदाज व्यक्त करणे मुश्कील बनले आहे. आदर्श गाव हिवरेबाजार येथे ३५ वर्षानंतर मतदारांनी मतदान केले. पद्मश्री पोपटराव पवार यांना प्रथमच गावात आव्हान दिल्याने निकाल काय लागतो. याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या बुऱ्हाणनगरमध्येही त्यांचेच पुतणे रोहिदास कर्डिले यांनी आव्हान उभे केले होते. यात कर्डिले आपले वर्चस्व राखतात काय याची उत्सुकता तालुक्याला लागली आहे. याप्रमाणेच निंबळक, गुंडेगाव, चिचोंडी पाटील, दरेवाडी, खंडाळा, खडकी, भोरवाडी, खारेकर्जुने, चास, कामरगाव, इमामपूर, टाकळी काझी येथील निवडणुका चुरशीच्या झाल्याने आणि दिग्गज मैदानात असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आदर्शगाव डोंगरगण, मांजरसुंबा येथील निकालाचीही सर्वजण प्रतीक्षा करीत आहेत.नगर तालुक्यातील अनेक मात्तबर नेत्यांच्या गावात निवडणुका झाल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.तालुक्यातील बहुतांशी गावात महाविकासआघाडी आणि भाजप यांच्यातच सरळ सरळ लढत झाल्या आहेत. यामुळे मतदार कोणाला कौल देतात याची प्रतीक्षा आता शिगेला पोहचली आहे.
----
दहा वाजताच होणार सर्व गावांची मतमोजणी..
नगर तालुक्यातील मतमोजणी पाउलबुद्धे विद्यालयात होणार आहे. यासाठी एकूण १५ टेबलावर चार फेऱ्यात ५६ गावांची मतमोजणी करण्याचे नियोजन निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील यांनी केले आहे. प्रत्येक फेरीत एकावेळी १५ गावांची मतमोजणी होणार असून एक तासांच्या अंतराने चार फेऱ्या पूर्ण होऊन एकूण ५६ गावांची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. सकाळी साडे दहापर्यंत सर्व गावांची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.