अहमदनगर : जिल्ह्यात कोरोना का वाढतो? याबाबत ‘लोकमत’ने नगर शहरातील सामान्य लोकांचे म्हणणे जाणून घेतले. कोणी शासन, प्रशासनाला दोष दिला, तर कोणी प्रत्येक नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे सांगितले. राज्य शासनावर घोटाळ्यांचे आरोप होत असल्याने कोरोना वाढविला जात असल्याचाही आरोप अनेकांनी केला. नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी नसल्यामुळेच प्रशासनाला दंडाची आकारणी करावी लागते आहे, यापेक्षा दुर्दैव काय, असा सवाल उपस्थित करून अनेकांनी लोकांच्याच निष्काळजीपणावर खापर फोडले आहे. लॉकडाऊन होत नसल्यामुळे कोरोना वाढत असल्याचे काही जण सांगतात, तर लॉकडाऊनपेक्षा लक्षणे असलेल्या लोकांनी घरात बसण्यापेक्षा रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
---------------------
सगळीकडे गर्दी, विनामास्क फिरणारे लोक, बाजारपेठा, बँका, मोठी रुग्णालये, बसस्थानके आदी ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासला आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. दारोदार जाऊन लस दिली जात नाही, तोपर्यंत कोरोना कमी होणार नाही.
- अतुल सुपेकर, नगर