वाळकी : वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे. पुढील सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचेच येणार आहे. त्यावेळी साकळाई पाणी योजनेचा प्रश्न आम्हीच मार्गी लावू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रविवारी वाळकी येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के यांसह मोठ्या संख्येने नेते उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, अच्छे दिन आनेवाले है, शेतकऱ्यांना दुप्पट भाव, महिलांना संरक्षण, बेरोजगांना रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा, कर्जमाफी असा केवळ खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडून हे सरकार सत्तेत आले. अशा निष्क्रिय भाजप सरकारला जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. उमेदवार थोरामोठ्यांचा आदर करणारा असावा, वडिलधाऱ्यांचा मानसन्मान करणारा असावा, परंतु तसे संस्कार विरोधी उमेदवारावर दिसत नाहीत. असा उमेदवार लोकसभेत जाता कामा नये. आमदार राहुल जगताप, आमदार अरूण जगताप, घनश्याम शेलार यांचीही भाषणे झाली.यावेळी राजेंद्र नागवडे, राजेंद्र फाळके, माधवराव लामखडे, रोहिदास कर्डिले, अशोक बाबर, निर्मला मालपाणी, शारदा लगड, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, रमेश भांबरे, अंबादास गारूडकर, किसनराव लोटके, प्रताप शेळके, सबाजी गायकवाड, भाऊसाहेब बोठे, देवराम कासार, शरद बोठे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे ‘साकळाई’ का दिली नाही? :जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 4:22 PM